esakal | शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी मुलाखतीसह भरती प्रक्रिया सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी मुलाखतीसह भरती प्रक्रिया सुरू

शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी मुलाखतीसह भरती प्रक्रिया सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता सहावी ते बारावीच्या शिक्षकांच्या रिक्त पदांवर मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत सुरू करण्यात आल्याने शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या अंतर्गत एकूण ५६१ शाळा व्यवस्थापनांच्या दोन हजार ६२ रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पद भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा: पुणे : कंपनीचे तीन कोटी ६८ लाख स्वतःच्या खात्यात वळविले

शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी मुलाखतीशिवाय पदभरतीची कार्यवाही पूर्ण केलेली आहे. आता मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही राबविण्यात येत आहे. यात शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरील आपल्या लॉगिनमध्ये जाऊन गुणवत्तेनुसार संबंधित पात्र ठरत असलेल्या संस्थेकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

संबंधित व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एका जागेकरीता १:१० या मर्यादेत (समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शाळा व्यवस्थापनांकडून मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही १३ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांसाठी सूचना :

- उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील

- उमेदवारांची अंतिम निवड व्यवस्थापनाकडून या ३० गुणाच्या आधारे होईल

- गुणवतेनुसार जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रमावर उमेदवाराची ‘पवित्र पोर्टल’मार्फत त्या-त्या व्यवस्थापनांकडे होईल शिफारस

-निवड प्रक्रियेबाबत काही अडचणी असल्यास संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांशी संपर्क साधावा.

- उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या ‘edupavitra@gmail.com’ या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

हेही वाचा: अतिक्रमणावर कारवाईसाठी चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला

पहिली ते पाचवीच्या शिक्षक भरतीबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही होणार आहे. मुलाखतीसह पदभरतीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी या गटात एकूण ३८१ पदे रिक्त आहेत. या पदांबाबत उच्च न्यायालयालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या रिक्त पदांसाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

‘‘अनेक दिवसांपासून मुलाखत यादी रखडली होती, त्यात अनेक संस्था ‘पवित्र पोर्टल’शिवाय बाहेरून शिक्षकभरतीसाठी जाहीरात देत होत्या. आता जाहीर केलेल्या शिक्षक भरतीमुळे उमेदवार आनंदी आहेत. शिक्षक भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नसल्याने उमेदवार नाराजी व्यक्त करत आहेत.’’- संतोष मगर, अध्यक्ष, डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन

loading image
go to top