कत्तलीसाठी आणलेल्या १३ गायींची सुटका, माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

दौंड शहरात कत्तलीसाठी आणलेल्या १३ गायींची पोलिस उप अधीक्षक एेश्वर्या शर्मा यांनी सुटका केली आहे. या प्रकरणी एका माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे, तर एका विद्यमान नगरपालिका सदस्याचा पती फरारी झाला आहे.

दौंड (पुणे) : दौंड शहरात कत्तलीसाठी आणलेल्या १३ गायींची पोलिस उप अधीक्षक एेश्वर्या शर्मा यांनी सुटका केली आहे. या प्रकरणी एका माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे, तर एका विद्यमान नगरपालिका सदस्याचा पती फरारी झाला आहे. दरम्यान, नगरपालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने भीमा नदी काठ, खाटीक गल्ली, कुरेशी गल्ली व अन्य भागांमध्ये विना परवानगी पशुधनाची बेसुमार कत्तल केली जाते. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दौंड शहरातील भीमा नदीकाठी विघ्ने वस्तीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी गायी आणण्यात आल्याची माहिती ३१ जुलै रोजी दौंड उप विभागाच्या पोलिस उप अधीक्षक (आयपीएस) एेश्वर्या शर्मा यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्वतः उप अधीक्षक कार्यालयातील पोलिस पथकासह घटनास्थळी जाऊन पडताळणी केली. तेथे बंदिस्त जागेत विकी दिलीप बनसोडे याच्या ताब्यातील तीन खोल्यांमध्ये अत्यंत घाणीत १३ गायी डांबण्यात आल्याचे आढळले. पोलिसांनी सदर गायी कोठून आणल्या, या बाबत विचारणी केली असता विकी बनसोडे याने कालू फिलीप याच्या सांगण्यावरून गायी कत्तलीसाठी आणल्याचा जबाब दिला. परंतु, सदर गायी कोणाच्या आहेत व त्या कशा आणल्या, याबद्दल मात्र त्याने माहिती दिली नाही. 

गावागावांत तयार होणार तळीरामांची यादी

याबाबत पंचनामा करून सदर १३ गायी तालुक्यातील एका पांजरपोळमध्ये स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, सहायक निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्यासह श्रीरंग शिंदे, कल्याण शिंगाडे, अण्णासाहेब देशमुख, सचिन बोराडे, अमजद शेख, अक्षय घोडके यांच्यासह दौंड पोलिस उप अधीक्षक कार्यालयातील पोलिस हवालदार नंदकुमार केकाण, सुभाष डोईफोडे, गणेश कडाळे, सुरेंद्र ओव्हळ यांनी या कारवाईत भाग घेतला.

दौंड पोलिस ठाण्यात पोलिस कॅान्स्टेबल रवींद्र काळे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार विकी दिलीप बनसोडे (वय २५ , रा. वडार गल्ली, दौंड) व कालू उर्फ बॅस्टियन अॅन्थोनी फिलीप (वय ५३ , रा. ईदगाह रोड, दौंड) या दोघांवर महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारणा अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय दंड विधान मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी बनसोडे हा माजी नगरसेवकाचा मुलगा आहे.
            
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Release of 13 cows brought for slaughter in Daund city