अन् बारामतीकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

मिलिंद संगई
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

गेल्या अनेक दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बारामतीकरांना हायसे वाटले. अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. भाजपसोबत अजित पवार गेल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या मागे नेमके काय राजकारण आहे हे अनेकांच्या समजण्यापलिकडचे होते, त्या मुळे या वर प्रतिक्रीया देण्यास कोणीही तयार नव्हते.

बारामती शहर - गेल्या अनेक दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बारामतीकरांना हायसे वाटले. अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. भाजपसोबत अजित पवार गेल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या मागे नेमके काय राजकारण आहे हे अनेकांच्या समजण्यापलिकडचे होते, त्या मुळे या वर प्रतिक्रीया देण्यास कोणीही तयार नव्हते.

आज दुपारी अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची बातमी आल्यानंतर बारामतीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. राजकीय वैमनस्य व कौटुंबिक वैमनस्य येऊ नये अशीच सर्व बारामतीकरांची इच्छा होती. गेल्या पाच दशकांपासून पवारांचे राजकारण जवळून पाहणा-या बारामतीकरांना सत्ता असो वा नसो पण कुटुंबात कटुता नको हे हवे होते. अजित पवार यांनी आज एक अतिशय समंजसपणाचा निर्णय उशीरा का होईना घेतला. तुटेपर्यंत ताणले नाही, याचेच समाधान अनेकांना वाटले.

अजित पवार यांनी सोडली भाजपची साथ; अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

सत्ता बारामतीकरांनी अनेकदा पाहिली, विरोधातही गेली पाच वर्षे काढली, मात्र कौटुंबिक कलह होऊ नये पवार कुटुंब अभेद्य राहावे हीच सर्वांची इच्छा होती. अजित पवारांच्या या निर्णयाने राजकारणापेक्षाही कुटुंब हेच महत्वाचे हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. 

गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडीत अनेकांच्या प्रतिक्रीया आल्या पण अजित पवार यांनी एकही बरी किंवा वाईट प्रतिक्रीया दिली नाही, त्याचीही आज बारामतीत चर्चा होती. युवा पिढी अजित पवारांच्या मागे होती, मात्र सर्वांनाच कुठे तरी दादांनी साहेबांसोबतच आपले राजकारण करावे असे वाटत होते. तुमच्या सर्व निर्णयात आम्ही सोबत आहोत, पण साहेबांना सोडून काही करु नका, ही भावना कार्यकर्त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखविली. 

अजित पवार यांचा राजकीय सन्यास?

अजित पवार यांनी राजकारणातील संन्यासाची भाषा केलेली असली तरीही बारामतीकरांचे त्यांच्यावर व त्यांचे बारामतीकरांवर प्रेम पाहता त्यांना ही बाब अशक्य आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने अजित पवारांना बारामतीकरांनी विजयी केले होते, ते त्यांच्यावरच्या गाढ विश्वासापोटीच....त्या मुळे अजित पवार संन्यास घेऊ शकतील ही शक्यता बारामतीकरांना धूसर वाटते आहे. नैराश्यातून बाहेर आल्यानंतर अजित पवार यांचे मन बदलेल व राज्याच्या विकासासाठी ते पुन्हा नव्या जोमाने सरकारमध्ये सहभागी होऊन कार्यरत होतील असाही विश्वास बारामतीकरांना वाटत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: relief in Baramati because of Ajit Pawar resign an DY CM