आधी व्याजासहित पीक कर्जाची परतफेड करा!

Agriculture-Loan
Agriculture-Loan

पुणे - शेतजमीन कसायंला पैसं नसत्यात म्हणूनश्‍यानी तर शेतकरी पिकाच्या पेरणी मारगी लावण्यासाठी गावच्या सोसायटीकडनं करजं काढत्यात. याला पहिलं यायाज द्यावा लागायचं. पण आता हे यायाज बंद झालं होतं. तीन लाखापस्तोर करजं घेतलं, की वरषानंतर फक्त मुद्दलंच भरावं लागायचं. पण आता म्हणत्यात, सरकारानं हा नेम बंद केलाय. आधी यायाजासहित करजं भरायचं आन पुन्हा सरकार शेतकऱ्याच्या खात्यावर यायाजाचे पैसं खात्यावरती टाकणार. हा नेम लईच उफरटा हाये. पहिलंच बरं होतं. पण असं का केला काय माहिती? ही शून्य टक्के व्याजाच्या सवलतीसाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) बदललेल्या नव्या नियमांबाबत जुन्नर तालुक्‍यातील गोळेगाव येथील शेतकरी शंकर ताम्हाणे यांची प्रतिक्रिया आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अगोदर व्याज भरून घ्यायचं. त्यासाठी शेतकऱ्यांनी पैसे जमा करण्यासाठी अट्टापिट्टा करायचा आणि परतफेड केल्यानंतर सरकार कधी खात्यावर पैसे जमा करणार, याची वाट बघत बसायचे, हा नियम काय कामाचा असा सवाल बारामती तालुक्‍यातील देऊळगाव येथील सुरेश रसाळ यांनी उपस्थित केला आहे. पूर्वी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत असाच नियम होता.

मात्र एकदा कर्ज आणि व्याज भरून घेतलं की सरकारकडून दोन दोन वर्षे शेतकऱ्यांना सवलतीचे पैसे मिळतंच नव्हते, असे मावळ तालुक्‍यातील शिलाटणे येथील शेतकरी गणपत भानुसघरे यांनी सांगितले. अगोदर व्याजासहित कर्जाची परतफेड करणे अशक्‍य असल्याचे मतही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. व्याज सवलतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याऐवजी सध्याचीच फक्त मुद्दल भरून घेण्याबाबतची पद्धत योग्य आहे. कारण नवा नियम हा जिल्हा बॅंका आणि शेतकरी या दोघांसाठीही अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे पीक कर्जात शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली प्रचलित पद्धत कायम राहावी, अशी मागणीही या शेतकऱ्यांची आहे.

राज्यातील पुणे आणि सातारा या दोन जिल्हा बॅकांच्यावतीने मागील दशकभरांपासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने देण्यात येते. मुळात पीक कर्ज हे दर साल दर शेकडा सहा टक्के व्याजदराने देण्यात येते. परंतु या व्याजावर केंद्र सरकारकडून तीन टक्के आणि राज्य सरकारकडून एक टक्का सवलत मिळत असते. पुणे व सातारा जिल्हा बॅंका या उर्वरित दोन टक्के रक्कम ही बॅंकेच्या नफ्यातून भरत असतात. यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज शून्य टक्के व्याजाने पडत असते, असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या व्याज सवलतीची रक्कम आतापर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावर जमा होत असे. त्यामुळे व्याज सवलतीच्या फरकाची रक्कम जिल्हा बॅंकेकडे आपोआप जमा होत असे आणि शेतकऱ्यांनाही केवळ मुद्दल रक्कमच भरावी लागत असे. परंतु आता "नाबार्ड'ने व्याजासहित पीक कर्जाची परतफेड करणे बंधनकारक केले आहे. अशी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ दिला जाईल, असा नवीन नियम केला आहे. याची चालू आर्थिक वर्षापासून (2020-21) अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुळात शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत असतो. त्यासाठीच तो खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज घेत असतो. यासाठीच शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याच्या हेतूने पुणे जिल्हा बॅंकेतर्फे तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने देण्यात येत आहे. परंतु आता केंद्र सरकारने याचा लाभ घेण्यासाठी अगोदर व्याजासहित कर्ज परतफेड करण्याचे बंधन घातले आहे. हे बंधन शेतकऱ्यांसाठी जाचक ठरणार आहे.
- रमेश थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा बॅंक.

प्रतिक्रिया
या नव्या नियमाचा पीककर्ज वसुलीवर परिणाम होऊ शकतो. कारण शेतकरी व्याजाची सवलत मिळण्यासाठी खूप अट्टापिट्टा करून मुदतीत मुद्दल कर्ज परतफेड करत असतात. आता त्यात व्याजाची भर पडल्याने रक्कम जमा करण्यात नाकीनऊ येतील. पर्यायाने परतफेडीचे प्रमाण घटू शकेल.
- शंकर रसाळ, सचिव, सेवा सहकारी सोसायटी, ता. बारामती.

व्याजाची सवलत मिळावी, यासाठी मुद्दल भरण्याचे बंधन घालण्यात आले होते. त्यात आता व्याजासहित रक्कम भरणे शेतकऱ्यांना अशक्‍य होणार आहे.
- भाऊसाहेब सदाफुले, सचिव, सेवा सहकारी सोसायटी, ता. जुन्नर.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com