वाघोली, उरुळीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्यास मान्यता मिळण्सासाठी पालकमंत्र्यांना साकडे

जनार्दन दांडगे.
Wednesday, 14 October 2020

वाघोली व उरुळी कांचन या दोन ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाण्यास तात्काळ मान्यता द्यावी अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. 

उरुळी कांचन (पुणे) : वाघोली व उरुळी कांचन या दोन ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाण्यास तात्काळ मान्यता द्यावी अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, वाघोली व उरुळी कांचन या पूर्व हवेलीमधील दोन्ही शहरांची लोकसंख्या, लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची अपुरी संख्या व या भागातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन, दोन्ही ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाण्याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयात मागिल सहा महिन्यापासून प्रलंबित आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून, उरुळी कांचन व वाघोलीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजुर करावा अशी मागणीही आमदार पवार यांनी आपल्या पत्रात केली आहे. 

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

याबाबत अधिक माहिती देताना आमदार पवार म्हणाले, वाघोलीची लोकसंख्या दिड ते दोन लाखावर पोचली आहे. सध्या वाघोली शहर लोणी कंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. वाघोली हद्दीत ट्रॉफिक जामचा प्रश्न मागिल काही वर्षापासून सतावत आहे. त्यातच लोणी कंद पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी असल्याने, वाघोलीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या भागातील वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन, वाघोलीसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव गृहखात्याकडे यापुर्वीच पाठवला आहे. हा प्रस्ताव सध्या पोलिस महासंचालक कार्यालयात मागिल सहा महिन्यापासून प्रलंबित आहे. 

Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

उरुळी कांचन पोलिस ठाण्याबद्दल बोलताना आमदार पवार म्हणाले, उरुळी कांचन शहर सध्या लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत आहे. मात्र, उरुळी कांचन शहराची वाढती लोकसंख्या व या भागातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन, तीन वर्षापूर्वीच उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अपुरी पोलिसांची संख्या लक्षात घेऊन, उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज आहे.

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

याबाबत बोलताना जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक  डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, वाघोली व उरुळी कांचन या दोन मोठ्या शहरांसाठी दोन स्वतंत्र पोलिस ठाणी निर्माण करावीत याबाबतचा प्रस्ताव यापुर्वीच पाठवून दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, वाघोली व उरुळी कांचन परीसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सध्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने, लोणी काळभोर व लोणी कंदसह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यात पोलिसांची संख्या अपेक्षापेक्षा खूपच कमी आहे. यामुळे सध्या पोलिसांवर कामाचा ताण अधिक आहे. वरील दोन पोलिस ठाणी निर्माण झाल्यास, वाघोली व उरुळी कांचन परीसरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Request to the Guardian Minister for approval of an independent police station for Wagholi and Uruli kanchan