इंदापुरातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

डाॅ. संदेश शहा
Monday, 15 June 2020

पुण्यातील रुबी हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. तेथे त्यांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यांची दुसरी चाचणी पाॅझिटिव्ह आली. त्यामुळे

इंदापूर (पुणे) : पुण्यातील खासगी रुग्णालयात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून उपचार घेत असलेल्या इंदापूर शहरातील ७७ वर्षीय कोरोनाबाधित ज्येष्ठ व्यक्तीचा रविवारी (ता. १४ जून) रात्री साडेदहाच्या सुमारास रुग्णालयात मृत्यू झाला. शासकीय नियमानुसार पुण्यातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पुण्यात सलग आठव्या दिवशी पेट्रोल दरवाढीचा भडका

इंदापूर तहसील कार्यालयातून अधिकारीपदावरून सेवानिवृत्त झालेले संबंधित ज्येष्ठ नागरिक शहरातील दर्गा मस्जिद चौकाजवळ राहत होते. दोन महिन्यांपूर्वी ते सोलापूरला आपल्या मुलीकडे गेले होते. लाॅकडाउनमुळे ते तेथेच अडकले होते. ते मधूमेह व उच्च रक्तदाब या विकाराने आजारी होते. तेथे त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवारी ते आपल्या पुतण्यासमवेत इंदापूरला आले होते. रक्तदाबाच्या आजारामुळे तपासणीसाठी येथील एका खाजगी रुग्णालयात गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील तपासणीसाठी पुण्याला जाण्यास सांगितले. 

लाॅकडाउनमुळे पिकात केला बदल, आज खेळतोय लाखात

पुण्यातील रुबी हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. तेथे त्यांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यांची दुसरी चाचणी पाॅझिटिव्ह आली. त्यामुळे त्यानंतर त्याच्यावर तेथेच उपचार सुरु होते. मात्र, रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा हा इंदापूर शहरातील पहिला, तर तालुक्यातील दुसरा बळी ठरला आहे. तसेच, दोन कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरात सध्या चिंतेचे वातावरण आहे. 

पालकमंत्री निवडणार प्रभारी गावकारभारी

इंदापूर शहरात कोणाला फ्ल्यूसारखी लक्षणे वाटत असल्यास त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा व मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired officer of Indapur dies of corona disease