'पोलिसांना अतिरिक्त भत्ता द्या'; माजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची सुप्रीम कोर्टात जनहित याचिका!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

पोलिसांवर हल्ले झाल्यास त्यासंबंधीचे दावे जलद गती न्यायालयात चालवावे. अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटाने सगळ्यासमोर गंभीर चित्र उभे केले आहे.

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तैनात असणाऱ्या देशभरातील सर्व पोलिसांना सरकारने अतिरिक्त भत्ता द्यावा. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्या पोलिसांना कार्यालयीन काम देण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहीत याचिका निवृत्त पोलिस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ऍड. अमित पै, ऍड. राजेश इनामदार, ऍड शैलेश म्हस्के यांच्यामार्फत बर्गे यांनी ही जनहित याचिका दाखल केली. याविषयी अधिक माहिती देताना बर्गे म्हणाले, एटीएस तसेच नक्षल भागात काम करणाऱ्या पोलिसांना दुप्पट पगार दिला जातो. सध्या सर्वच पोलिस जीवावर उदार होऊन काम करत आहेत. अशावेळी सरकारने त्यांच्या पगारात कपात न करता त्यात वाढ केली पाहिजे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबरोबरच पोलिस दलात उच्च रक्तदाब, मधुमेहच्या आजाराने त्रस्त असणारे कर्मचारी मोठ्या संख्येने आहे. त्यांना बंदोबस्ताची जबाबदारी देण्यापेक्षा इतर कार्यालयीन काम देण्यात यावे. ही जनहित याचिका दाखल करताना देशातील 35 राज्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 

पोलिसांवर हल्ले झाल्यास त्यासंबंधीचे दावे जलद गती न्यायालयात चालवावे. अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटाने सगळ्यासमोर गंभीर चित्र उभे केले आहे. भविष्यात यासारख्या येणाऱ्या संकटांना सामोरे जाताना पोलिसांना अत्याधुनिक प्रकारचे प्रशिक्षण मिळावे, असेही बर्गे यांनी यावेळी सांगितले. 

- कोरोनाचा मृत्यूदर कसा कमी होणार? वाचा उपचाराची त्रिसूत्री

ज्या भागात पोलिस बंदोबस्ताचे काम करत आहेत त्यांना सुरक्षा किट पुरवणे, तसेच त्याठिकाणी वैद्यकीय सेवेचा बंदोबस्त करणे, संवेदनशील भागात काम करताना पोलीसांना प्राथमिक उपचार मिळणे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे गरजेचे असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

काही राज्यांनी पोलिसांच्या पगारात कपात केली आहे. अशाने पोलिसांच्या मनात नाराजी असून ज्या राज्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे त्यांनी पोलिसांना कुठलीही कपात न करता पगार देणे अत्यावश्यक आहे, असे बर्गे यांनी सांगितले.

- पुण्यात पेशंटसाठी तातडीची रिक्षा; अशी मिळणार मदत!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired police officer Bhanupratap Barge has filed a litigation in SC seeking additional allowances for all police