गुंतवणुकीसाठी पुण्यापासून सुरुवात योग्य - आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 March 2020

विमानतळाबाबत सकारात्मक घोषणा  
‘‘पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पुरंदर आणि लोहगाव विमानतळासंदर्भात राज्य सरकार लवकरच सकारात्मक घोषणा करेल’’, असेही ठाकरे म्हणाले. बरोबर काम करून राज्याला पुढे घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

पुणे - ‘शिक्षण, उद्योग, कृषी, संशोधनासह राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. रस्त्यापासून इंटरनेटचे जाळे राज्यभर पसरले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या सर्वांचे स्वागतच आहे. राज्यात गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी पुणे अत्यंत योग्य ठिकाण आहे,’’ असे मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील गुंतवणूक वाढावी या उद्देशाने ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर’ (एमसीसीआयए) यांच्या वतीने दोनदिवसीय ‘इंटरनॅशनल बिझनेस समीट’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ते बोलत होते. ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष प्रदीप भार्गव, महासंचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते. इटली, फ्रान्स, साउथ आफ्रिका, मलेशिया, जर्मनीसह सुमारे २० देशांचे कौन्सिलर जनरल आणि व्यापार आयुक्त तसेच शहरातील उद्योगपतींनी समीटमध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा :  ससूनमध्ये गरीब रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

ठाकरे म्हणाले, ‘‘कोणालाही उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र चालना देणारे राज्य ठरले आहे. शाश्वत शेतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर औद्योगिक क्षेत्राने भर द्यावा. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत विधानसभेत चर्चा झाल्यानंतर योग्य तो निर्णय होईल. एशिया इकनॉमिक डायलॉग आणि इंटरनॅशनल बिझनेस समीट या दोन्ही परिषदा राज्यासाठी महत्त्वाच्या आहेत.’’ 

लघुशंकेसाठी थांबले अन् 5 जणांसाठी टेम्पो ठरला कर्दनकाळ

भार्गव म्हणाले, ‘‘उद्योग-व्यवसायासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व बाबी पुण्यात उपलब्ध आहेत. शिक्षण, संशोधन, आरोग्य आणि सेवा क्षेत्रात पुणे आघाडीवर आहे.’’ गिरबने यांनी आभार व्यक्त करीत समीटचे महत्त्व सांगितले. तसेच देशातील गुंतवणुकीत शहराचे योगदान नमूद केले. ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लि.’चे अध्यक्ष पी. सी. नांबियार, ‘विकफील्ड प्रॉडक्‍ट एलएलपी’चे व्यवस्थापकीय संचालक मुकेश मल्होत्रा, ‘प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड’चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, ‘पर्सिस्टंट सिस्टिम लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे आणि ‘प्रवीण मसालेवाले’चे संचालक आनंद चोरडिया यांनी त्यांच्या उद्योगाचा प्रवास उलगडत अनुभव सांगितले. शहरातील काही उद्योगाचे स्टॉल या वेळी मांडण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Right from start pune for investing aaditya thackeray