
इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ ई-वाहनांच्या पथ्यावर पडू लागली आहे. परिणामी ई-वाहनांच्या खपाने शहरात वेग घेतला आहे. त्यातच ई वाहनांसाठी बाजारात सध्या मुबलक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकही सुखावले आहेत.
पुणे - इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ ई-वाहनांच्या पथ्यावर पडू लागली आहे. परिणामी ई-वाहनांच्या खपाने शहरात वेग घेतला आहे. त्यातच ई वाहनांसाठी बाजारात सध्या मुबलक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकही सुखावले आहेत. पेट्रोलचे दर १०० रुपये प्रती लिटरच्या उंबरठ्यावर पोचले आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांवर आर्थिक ताण वाढू लागला आहे. तुलनेने इलेक्ट्रीक वाहनांसाठीचा खर्च कमी आहे. तसेच पेट्रोलवरील वाहनाचा सर्व्हिसिंगचा खर्चही ई वाहनांच्या तुलनेत जास्त असतो. ई वाहनांना तुलनेने देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी असतो. २५० वॅटपेक्षा कमी क्षमतेची मोटार असलेल्या ई-वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणीची गरज नसते आणि वाहन चालविण्याच्या परवान्याचीही आवश्यकता नसते. त्यामुळेही ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा विद्यार्थ्यांना ई-वाहने सोयीची वाटत आहेत. चार तासांच्या एका चार्जिंगमध्ये दुचाकी सुमारे ५० ते ७० किलोमीटर धावते तर मोटार सुमारे २५०-३०० किलोमीटर धावते. दुचाकी ५८ हजारांपासून १ लाखांपर्यंत आहे तर, मोटारी १५ ते २७ लाखांपर्यंत आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मोटारींसाठीही अनेक शहरांत चार्जिंग स्टेशन्स झाली आहेत. त्यामुळे पुणे-नाशिक, पुणे-सातारा-कोल्हापूर, पुणे-मुंबई मार्गासाठीही लोक ई-मोटार वापरू लागले आहेत. बॅटरीचा दर्जा आणि चार्जिंगची सुविधा, यातही नव्या तंत्रज्ञानामुळे बदल होत आहेत. त्यामुळेही नागरिकांचा कल आता ई वाहनांकडे वाढू लागला आहे. आरटीओ कार्यालयातही गेल्या तीन महिन्यांपासून दरमहा सुमारे २०० पेक्षा जास्त ई- वाहनांची नोंदणी होऊ लागली असून त्यात दुचाकींचे प्रमाण लक्षणीय आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
Video : 'झुलवा पाळणा...पाळणा, बाळ शिवाजीचा...'; शिवजयंतीनिमित्त नंदी सिस्टर्सची म्युझिकल ट्रीट
आरटीओमधील नोंद
२०१९ - एकूण ई वाहनांची नोंदणी १००१
दुचाकी - ७५५
२०२० एकूण ई वाहनांची नोंदणी - १४५८
दुचाकी - १२४२
पेट्रोलच्या तुलनेत इंधन, देखभाल दुरुस्तीच्या खर्चात बचत होत असल्यामुळे नागरिकांचा कल ई- वाहनांकडे वाढत आहे. ई वाहनांमुळे प्रदूषणही नियंत्रण होते. गाडीतून आवाज येत नसल्यामुळे गोंगाट कमी होतो. ई गाडी अचानक बंद पडत नाही. तसेच ई वाहनाची बॅटरी घरीच चार्ज करता येते चार्जिंगही घरी करण्याची त्यामुळे सर्वांनाच सोयीची वाटते. वित्त कंपन्यांचेही आकर्षक पर्याय असून एक्सचेंज ऑफरमुळेही ग्राहकांचा फायदा होत आहे.
- गणेश चोरडीया, दुचाकी वितरक
हॉटेल की बेकायदा धंद्याचं कोठार! पुणे-सोलापूर हायवेवरील लॉजवर पोलिसांचा छापा
ई मोटारींसाठी सर्वच कंपन्यांची चार्जिंगची व्यवस्था आहे. राज्यातील बहुतेक सर्व शहरांत चार्जिंग स्टेशन्स असून ती अहोरात्र उघडी आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे. पेट्रोल - डिझेलच्या तुलनेत या ई- मोटारीचा देखभाल खर्च कमी आहे. घरच्या चार्जिंगद्वारे ६ तासांत तर फास्ट चार्जिंग स्टेशनवर ८० टक्के बॅटरी सुमारे ५० मिनिटांत चार्ज होते. त्यामुळे पुण्यातच नव्हे तर, जगभर ई मोटारींचा खप वाढू लागला आहे.
- शिवम सरमुकादम, शो रूम मॅनेजर
प्रती किलोमीटर १७ ते १८ पैसे खर्च येतो. त्यामुळे पेट्रोलच्या तुलनेत ई- दुचाकी खूप परवडते. माझे दुकान असून काही मालाचीही दुचाकीवरून वाहतूक करता येते. ई दुचाकीचा माझा अनुभव खूप चांगला आहे. दुचाकीबरोबर दोन बॅटरी आहेत. त्यामुळे बॅटरी घरी चार तासांत चार्ज होते. त्यामुळे गैरसोय होत नाही. एका चार्जिंगमध्ये ७० किलोमीटरपर्यंत दुचाकी धावते.
- अमित रहाळकर, दुचाकी ग्राहक
Edited By - Prashant Patil