रुटमॅपमुळे 'पीएमपी' होतेय मालामाल!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

बसगाड्यांवर मार्गाचा फलक ठळकपणे लावण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांच्या बसगाड्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येत आहे.

पुणे : बसगाड्यांवर मार्गाचा फलक लावणे, थांब्यावरच बसगाड्या उभ्या करणे, फेऱ्या रद्द न करणे अशा साध्यासोप्या उपायांमुळे या आठवड्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) रोजचे उत्पन्न 40 लाख रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे. 'पीएमपी'चे रोजचे उत्पन्न आता 1 कोटी 70 लाखांपर्यंत पोचले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात मार्गांवर नव्या आणि जुन्या बसगाड्या उतरवल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होऊन उत्पन्न वाढण्याची अपेक्षा होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून रोज 1 हजार 550 बसगाड्या मार्गांवर असूनही रोजचे उत्पन्न 1 कोटी 40 लाख रुपयांच्या आसपासच राहिले होते. यामुळे त्यामागील कारणे 'पीएमपी'ने जाणून घेतली. त्यात बसचालक, वाहक आणि चेकर यांच्या किरकोळ चुकांचा परिणाम उत्पन्नावर होत असल्याचे दिसून आले.

- आता 'या' नेत्याला आमदार करणार : अजित पवार

यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, बसगाड्यांवरील मार्गाचा फलक ठळकपणे दिसत नसल्याने प्रवाशांची अडचण होत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, थांब्यापासून बस लांब थांबणे, गॅस भरण्याच्या नावाखाली बसच्या फेऱ्या रद्द करणे, चालक आणि वाहक उशिराने आल्यामुळे लांबच्या फेऱ्यांऐवजी जवळच्या मार्गांवर सेवा पुरवणे आदी कारणांमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. 

- अमोल कोल्हेंच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा; उत्सुकता 18 डिसेंबरची

''आता मार्गाच्या फलकांपासून ते प्रत्येक थांब्यावर बस कुठे आणि किती वेळ थांबते, चालक वेळेत आले का, बसमध्ये इंधन आहे का, आदी बाबींची काटेकोरपणे तपासणी होत आहे. या प्रकरणी चालक-वाहकांविरोधात दंडात्मक कारवाई होत असल्याने चुका कमी होत आहेत. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत रोजच्या प्रवासी संख्येत 50 हजारांनी वाढ झाली आहे,'' असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 

फलक नसल्यास 1 हजार दंड 

बसगाड्यांवर मार्गाचा फलक ठळकपणे लावण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांच्या बसगाड्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येत आहे. तसेच फलकाभोवती दिवा नसलेल्या बसच्या चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. देखभालीसाठी डेपोत येणाऱ्या बसची कामे करण्यात येतात का, याचीही तपासणी करण्यात येत आहे. 

- सावरकरांवरून शिवसेनेचा राहुल गांधींना इशारा; 'इथे तडजोड नाही'​

'पीएमपी'चे उत्पन्न (रुपयांमध्ये) 

9 डिसेंबर- 1 कोटी 73 लाख 
10 डिसेंबर - 1 कोटी 65 लाख 
11 डिसेंबर - 1 कोटी 66 लाख 
12 डिसेंबर - 1 कोटी 57 लाख 
13 डिसेंबर - 1 कोटी 67 लाख 

रोजचे प्रवासी :- 

मागील आठवड्यात : 10 लाख 50 हजार 

चालू आठवड्यात : 11 लाख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roadmap ideas are likely to increase PMP yields