अडीच वर्षांपासून फरारी असलेल्या दरोडेखोरास अटक; नाव बदलून राहत होता नगरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

२० नोव्हेंबर रोजी माऊली भोसले हा दौंड शहरातील नगर मोरी चौकात येणार असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचला.

दौंड (पुणे) : बेटवाडी फाटा (ता. दौंड) येथे दरोडा टाकून गेल्या अडीच वर्षापासून फरारी असलेल्या दरोडेखोरास दौंड शहरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी माऊली बंट्या भोसले (वय २१, रा.बेटवाडी, ता. दौंड) या दरोडेखोरास ताब्यात घेतले आहे. ४ एप्रिल २०१८ रोजी बेटवाडी फाटा येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून उदेश महादेव चव्हाण (वय ३५, रा. मालाड, मुंबई) या प्लॅस्टिक पॅकेजिंग करणाऱ्या उद्योजकाकडील १ लाख १७ हजारांचा ऐवज दरोडा टाकून एका टोळीने लंपास केला होता. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी एका महिलेसह एकूण सहाजणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. त्यापैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता गृहित धरून पुण्यात महापालिकेने तयारी करावी

दरोडा प्रकरणातील फरार असलेला पाचवा आरोपी माऊली भोसले हा नाव बदलून नगर जिल्ह्यात राहत होता. २० नोव्हेंबर रोजी माऊली भोसले हा दौंड शहरातील नगर मोरी चौकात येणार असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. माऊली भोसले याच्याविरूध्द श्रीगोंदा (जि. नगर) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दरोड्यातील सहावा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. 

आमदार होण्याचा प्रयत्न करु नको, नाहीतर...; मनसेच्या रुपाली पाटील यांना धमकी

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड आणि सुभाष राऊत यांनी या कारवाईत भाग घेतला. दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robber arrested by Police in Daund who absconding from last two years