साडेचार कोटीचे सिगारेट लुटलेल्यांचा पोलिसांकडून थरारक पाठलाग 

crime
crime
Updated on

शिरूर (पुणे) : सुमारे साडेचार कोटी रुपये किमतीच्या सिगारेट पाकिटांनी भरलेले दोन कंटेनर चालकांना बंदुकीचा धाक दाखवून मध्य प्रदेशात पळवून घेऊन निघालेल्या टोळीला पोलिसांनी थरारक पाठलाग करून शिरूरजवळ पकडले. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन पळून जात उसात लपून बसलेल्या सात जणांना गुरुवारी पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत त्यांना शिरूर पोलिसांची मदत झाली. 

दिनेश वासुदेव झाला, सुशील राजेंद्र झाला, मनोज केशरसिंग गुडेन, मनोज ऊर्फ गंजा राजाराम सिसोदिया, ओमप्रकाश कृष्ण झाला, कल्याण सदुल चौहान व सतीश आंतरसिंग झांजा, अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे असून, हे सर्व मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील आहेत. या टोळीविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात महागड्या औषधांनी भरलेला ट्रक पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड, फौजदार अमोल गोरे, सहायक फौजदार दत्तात्रेय गिरमकर यांच्यासह पथक तपास करीत होते. आरोपींचा ठावठिकाणा लागल्यानंतर पथकाने मध्य प्रदेशात देवास व इंदूर भागात जाऊन त्यांची छायाचित्रे मिळवली. 

त्या आधारे शोध चालू असताना बुधवारी सायंकाळी या पथकातील काही जण शिरूरहून चौफुल्याला जाताना एक विना क्रमांकाचा कंटेनर त्यांच्यासमोरून भरधाव गेला. संशय आल्याने पथकाने पाठलाग केला असता फोटोतील वर्णनाचा एक जण कंटेनर चालवत असल्याचे व त्यामागे तसाच आणखी एक कंटेनर असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पथकातील इतरांना; तसेच शिरूर पोलिसांना माहिती देत नाकेबंदी केली. न्हावरे येथून पाठलाग चालू होता. शिरूरच्या सतरा कमानी पुलाजवळ शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. काबुगडे, जितेंद्र मांडगे, सुदाम खोडदे, कल्पेश राखुंडे यांनी नाकाबंदी केली. त्यामुळे संशयितांनी कंटेनर जागेवरच सोडून शेजारील उसाच्या शेतात पलायन केले. दरम्यान, पथकाने दोन्ही कंटेनर रात्रीच ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळी नाकाबंदी करून करून सात जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून बनावट रिव्हॉल्व्हर, चॉपर, चाकू; तसेच वाहनाच्या बोगस नंबरप्लेट, सहा मोबाईल व 13 हजार सहाशे रुपये जप्त केले. 

बंदुकीचा धाक दाखवून पळवले कंटेनर 
जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे चार कोटी 51 लाख 58 हजार चारशे रुपये किमतीच्या सिगारेटच्या पाकिटांनी भरलेले 588 बॉक्‍स होते. हा माल रांजणगाव एमआयडीसीतील आयटीसी कंपनीतून भरून नेत असताना या टोळीने सुपे- मोरगाव रस्त्यावर कंटेनर अडवले. चालकांना बंदुकीचा धाक दाखवून कंटेनर पळवून नेले. ते मध्य प्रदेशात नेत असताना पकडले गेले. 

आंतरराज्य टोळीतील दरोडेखोर 
अटक केलेले सात जण आंतरराज्य टोळीतील दरोडेखोर असून, त्यांच्याविरुद्ध कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, हरियाना, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com