पुणे विद्यापीठात गैरव्यवहार? आदेश झुगारत 'ते' पैसे वाटलेच कसे?

Pune_University
Pune_University

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'सेंट्रल पूल'च्या माध्यमातून तब्बल ६० लाख रुपयांचे नियमबाह्य वाटप झाल्याचे 'सकाळ'ने समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एवढी मोठी रक्कम वाटप कशी झाली?, कोणालाही चूक कशी लक्षात आली नाही असा प्रश्न व्यवस्थापन परिषद सदस्यांनी, अधिसभा सदस्यांनी उपस्थित करत याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केली आहे. 

पुणे विद्यापीठात विविध प्रकारचे मानधन, भत्ते देऊन मोठ्या प्रमाणात लाभ मिळवला जात असल्याने दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे वाटप केले जात होते. यावर नियंत्रण आणण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने नेमलेल्या समितीने सेंट्रल पूल, गोपनिय कामाचे भत्ते यासह इतर मानधन वाटपावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बंधन घालण्याची शिफारस केली. त्यास मान्यता देत १ एप्रिल २०१९ पासून भत्ते बंद केले. काही दिवसांपूर्वी वित्त विभागात 'सेंट्रल पूल'चे ६० लाख रुपये वाटप केल्याचे 'सकाळ'ने समोर आणले. त्यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हे पैसे पुन्हा वसूल केले जात असल्याचे स्पष्ट केले. पण पैसे वाटप झालेच कसे हा प्रकार उपस्थित केला जात आहे. पुणे विद्यापीठाच्या कर्मचारी, अधिकारी यांच्यातही याविषयावर उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. 

'सेंट्रल पूल'चे पैसे वाटप केले जाऊ नयेत, असे आदेश व्यवस्थापन परिषदेनेच दिले होते. तरीही हे पैसे कसे काय दिले गेले याची चौकशी झालीच पाहिजे. यासाठी समिती नेमावी अशी मागणी कुलगुरूंकडे केली जाणार आहे. तसेच व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाईल."
- राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

"आदेशाचे उल्लंघन करून यात पैसे वाटप झाल्याने यात चूक झाली आहे हे स्पष्टच आहे, पण या निधीच्या वाटपाचा सूत्रधार समोर आला पाहिजे, त्यामुळे सत्य समोर आणण्यासाठी चौकशी समिती नेमली पाहिजे. विद्यापीठाची ही कामकाजाची पद्धत अशोभनिय आहे. याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे."
- संतोष ढोरे, सदस्य, अधिसभा

"अशा प्रकारे पैसे वाटप केल्याने विद्यापीठाच्या प्रतिमेला तडा जात आहे. आम्हालाही याबाबत चौकशी केली जाते. त्यामुळे या प्रकारातील दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी समिती नेमली पाहिजे. अन्यथा याविरोधात विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन केले जाईल."
- डॉ. नंदू पवार, अधिसभा सदस्य

विद्यापीठाने विद्यार्थी हिताकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याउलट "विद्यार्थी उपाशी अन् विद्यापीठ तुपाशी "अशी गत झाली आहे. यास कुलगुरूही पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणी समिती नेमूण चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे."
- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पींग हँड

(Edited by Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com