esakal | आरटीई प्रवेश कधी होणार; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

RTE Admission

आरटीई प्रवेश कधी होणार; वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी काढलेल्या ऑनलाइन लॉटरीमध्ये पुणे जिल्ह्यातील १४ हजार ५६७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सध्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले संचारबंदीचे निर्बंध उठविल्यानंतरच प्रवेशाबाबतच्या पुढील सूचना पोर्टलवर उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशाचा मार्ग संचारबंदी संपल्यानंतरच मोकळा होणार आहे.

आरटीईअंतर्गत राखीव प्रवेशाकरिता राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांनी नोंदणी केली होती. याद्वारे ९६ हजार ६८४ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी ७ एप्रिलला लॉटरी काढली. या लॉटरी प्रक्रियेच्या कामकाजाला वेळ लागणार होता, म्हणून पालकांना १५ एप्रिलपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे एसएमएस येतील, असे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले. त्याप्रमाणे १५ एप्रिलपासून पुणे जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात पालकांना एसएमएस येण्यास सुरवात झाली. पुणे जिल्ह्यात बोगस अर्ज सापडल्याने प्रवेशासाठी लॉटरी काढली असली, तरीही शुक्रवारपर्यंत पालकांना प्रवेश निश्चितीसाठी एसएमएस पाठविले नव्हते. मात्र, त्यानंतर शुक्रवारी उशिरा पुण्यातील पालकांना एसएमएस पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हेही वाचा: पुणे : बालेवाडीत रेमडेसिव्हीरची बेकायदा विक्री करणाऱ्या सख्ख्या भावांना अटक

पोर्टलवर मिळणार सूचना

३० एप्रिलनंतरच प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना दिल्या जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी समितीकडे कागदपत्रांच्या पडताळणीसाठी गर्दी करू नये, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने प्रवेशाच्या पोर्टलवर दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील आकडेवारी

९८५ - शाळा

१४,७७३ - प्रवेशासाठी उपलब्ध जागा

५५,८१३ - प्रवेशासाठी आलेले अर्ज

१४,५६७ - लॉटरीद्वारे निवड झालेले विद्यार्थी