esakal | ‘आरटीई’ बोगस अर्ज प्रकरण जाणार पोलिसांकडे

बोलून बातमी शोधा

RTE
‘आरटीई’ बोगस अर्ज प्रकरण जाणार पोलिसांकडे
sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना पुणे जिल्ह्यात बोगस अर्ज (डुप्लिकेट अर्ज) करून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मात्र, यंदा या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुण्यात जवळपास ५७२ बोगस अर्ज भरण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रवेशाची ऑनलाइन लॉटरी जाहीर होण्यास उशीर झाला. याबाबत मागील आठवड्यात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.

हेही वाचा: लसीकरणासाठी मांडवांचा घाट

आरटीईसाठी अर्ज भरताना आपल्या पाल्याचे नाव लॉटरीमध्ये यावे, म्हणून पालक अनेकदा दोन अर्ज भरतात. मात्र, पडताळणीमध्ये त्यातील एक अर्ज रद्द होतो. परंतु यंदा पालकांनी दुसरा अर्ज न भरताही त्याच नावाने दुसरा अर्ज भरल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर काही पालकांना अर्ज डिलीट झाल्याचा मेसेज आला. याबाबत पालकांनी शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता त्याची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी पालकांनी डुप्लिकेट अर्ज भरल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना दिसले.

आरटीई प्रवेशासाठी पालकांची दरवर्षीच चढाओढ लागते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. याची शिक्षण विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांना दिले आहेत. आदेशानुसार प्रकरणाची पोलिस तक्रार करण्यासाठी शिक्षणाधिकारी लवकरच पावले उचलणार आहेत.

हेही वाचा: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; वीकेंड लॉकडाउनचा चांगला इफेक्ट!

''आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशादरम्यान ऑनलाइन अर्ज भरताना पालकांनी डुप्लिकेट अर्ज भरल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात घडल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवेशाची लॉटरी लावण्यास उशीर झाला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी सायबर शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. त्याशिवाय लवकरच त्याबाबत पोलिस तक्रार करण्यात येणार आहे.''

- सुनील कुऱ्हाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), पुणे जिल्हा परिषद