esakal | ‘पंच’नामा : उत्सव निर्बंधांचा, जप शिवथाळीचा
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘पंच’नामा : उत्सव निर्बंधांचा, जप शिवथाळीचा

sakal_logo
By
सु. ल. खुटवड-सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुख्यमंत्र्यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दोन आठवड्यांचे कडक निर्बंध लागू केल्यानंतर गुरुवारपासून रस्ते सुनसान होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ओस पडलेले रस्ते पाहण्यासाठीही नागरिकांनी मोठी गर्दी केली. काही लोकं उगीचच रस्त्यावर आले होते, हे सहज म्हणून फिरायला आलेल्या अनेकांच्या लक्षात आले. मात्र बोलणार कोणाला? काही बोलायला जावे तर लोकं मास्क काढून लगेचच हमरा- तुमरीवर यायला तयार होते. पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे ११ ते १४ एप्रिल दरम्यान लस उत्सव साजरा केला. आता रस्त्यावरची गर्दी पाहून पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान लोकं ‘निर्बंध उत्सव’ साजरा करतात की काय, अशी भीती आहे.

हेही वाचा: बापरे! सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी ओलांडला २ लाखाचा आकडा

मनोज आणि धीरजही आज सकाळी आठपासून मोकळे रस्ते पाहण्यासाठी हिंडत होते. त्यांच्यासारखे बरीच लोकं रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यातच पोलिसांचा वेळ जाऊ लागला. स्वारगेटजवळ पोलिसांनी मनोज व धीरजला अडवले.

‘‘साहेब, आपण कोठे चालला आहात’’? एका पोलिसाने नम्रतेने विचारले. पोलिसांचे हे वागणे पाहून मनोजला तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ‘पंछी बनू उडते फिरू, मस्त गगन मे..आज मै आजाद हू, दुनिया के चमन में’ हे गाणं मनोजच्या ओठावर आले. मात्र, असं म्हटल्यावर या ‘पंछी’ला लगेचच पिंजऱ्यात बंद करतील, अशी भीती त्याला वाटली.

‘‘आम्ही. आम्ही ना..शिवथाळी खायला चाललोय. सरकारने शिवथाळी खायला जाण्यासाठी परवानगी दिली आहे, हे आपल्याला माहिती असेलच.’’ मनोजने उत्तर दिले.

‘‘बुलेटवर बसून, रेबनचा गॉगल घालून, आयफोन जवळ बाळगत तुम्ही शिवथाळी खाण्यासाठी चालला आहात. आपल्या देशातील गरीब मंडळी बरीच सुधारलेली दिसतायत.’’ पोलिसाने हसत म्हटले.

हेही वाचा: कोरोना संकटात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पाऊस येणार मोठा!

‘‘साहेब, आम्ही फार गरीब आहोत. अन्न खावून कसंबसं दिवस ढकलतोय. बुलेट, गॉगल, आयफोन हे सगळं मित्रांकडून उसने घेतले आहे. घरात दोन दिवसांपासून चूलसद्धा पेटली नाही.’’

‘‘कानाखाली एक पेटवल्यावर चूल पेटते की नाही हे खरं सांगाल. चूल पेटत नसेल पण गॅस तरी पेटतो का नाही.’’ पोलिसाने रागाने म्हटले.

‘‘साहेब, गॅस पेटवण्यासाठी सिलिंडर आणायलाही आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही शिवथाळी आणायला चाललोय.’’ धीरजने म्हटले.

‘‘बरं. ही शिवथाळी नक्की कोठे मिळते, हे माहिती आहे का?’’ पोलिसाने विचारले.

‘‘नाही ना साहेब. सकाळी आठपासून शिवथाळी केंद्र शोधतोय. त्यासाठी तीनशे रुपयांचे पेट्रोल संपले पण हे केंद्र अजून काही सापडले नाही. तुम्हाला माहिती आहे’’? मनोजने विचारले.

‘‘म्हणजे काय? चला तुम्हाला दाखवतो.’’ असे म्हणून पोलिसाने स्वारगेट एसटी डेपोतील डावीकडील मोकळ्या जागेत त्यांना नेले. तिथे शेकडो तरुण मंडळी सोशल डिस्टन्स पाळून उभे होते. त्यांचे मॉडर्न राहणीमान पाहून, एवढी सगळी मंडळी येथे कशाला जमा झाली आहेत, असा प्रश्‍न मनोज व धीरजला पडला.

हेही वाचा: ससून 'व्हेंटिलेटरवर'; एकाच बेडवर होतायत तिघांवर उपचार

‘‘ही सगळी मंडळी शिवथाळी खायला बाहेर पडली आहेत. संपूर्ण पुण्यात आज या वेळेपर्यंत एक लाख पंधरा हजार दोनशे बत्तीस जणांनी आपण शिवथाळी खायला बाहेर पडलो आहोत, हे कारण दिलं आहे. आम्ही त्यांची शहनिशा केली असता, त्यातील फक्त तीनशे लोक शिवथाळीसाठी बाहेर पडली आहेत. त्यांना आम्ही सोडून दिलं आहे. ’’ तेथील पोलिसाने सांगितले.

‘‘उर्वरित बोगस लोकांना आम्ही अन्न-पाण्यावाचून दिवसभर असं उभे करणार आहोत. गरिबांची भूक म्हणजे काय असतं, याचा अस्सल अनुभव आता घ्या.’’ एका पोलिसाने असं म्हटल्यावर मनोज व धीरज मटकन खाली बसले.