Panchanama
Panchanama

महिलादिनी आम्ही ‘दीनवाणी’

महिलादिनानिमित्त आपण काहीतरी वेगळं करायचं, हे आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून ठरवत आहोत. शेवटी दोन दिवसांपूर्वी आम्ही ठरवलं, की या दिवशी बायकोला पूर्ण सुटी द्यायची. त्यानुसार साडेपाचचा गजर लावून आम्ही गाढ झोपी गेलो. साखरझोपेत असतानाच गजरच्या कर्णकर्कश आवाजाने आमची झोप उडाली. पण गजरचं बटन न दाबल्याने तो वाजतच राहिला. त्यावर आम्हाला तीव्र संताप आला. ‘‘ए बहिरी- बिहिरी झालीस काय? ते गजरचं नरडं आवळ आधी.’’ आम्ही जोरात ओरडलो. त्यावर बायकोने फक्त कुस बदलली. ‘‘ए ऊठ...’’ असं म्हणताच आम्ही जीभ चावली. ‘अरे आज महिलादिन. बायकोची सगळी कामे आपल्याला करायची आहेत’ हे आठवले. मात्र, गजर बंद कसा करायचा, हेच आम्हाला कळेना कारण इतक्या वर्षात तो बंद करण्याची वेळ आमच्यावर कधीच आली नव्हती. सकाळी सहाच्या सुमारास दूधवाला भैय्या आला. पण दूध कशात घ्यायचे, हेच कळेना. भांड्यांची बरीच शोधाशोध केली. शेवटी एका घमेल्यात दूध घेतलं.

हेही वाचा - भारीचं! आता मेट्रोतून करता येणार सायकलसह प्रवास
दूध कशात तापवायचं, हा प्रश्‍न आला. सुदैवाने एक पातेलं दिसलं. ते घासायचं की नाही, याबाबत छापा- काटा केला. काटा आल्याने भांडं घासून ठेवलं. त्यानंतर दूध तापवायला ठेवलं. तोपर्यंत अंघोळ उरकावी, असं म्हणून आम्ही बाथरूममध्ये शिरलो. बाहेर आलो तर दूध उतू गेले होते. मग शेगडी आणि किचन ओटा साफ केला. तोपर्यंत नऊ वाजले होते. चपात्यांसाठी पीठ मळून ठेवण्यासाठी आम्ही परातीत गव्हाचे पीठ ओतले व त्यात पाणी ओतले पण पिठाची लापशी झाली. मग त्यात पुन्हा पीठ ओतले. मग पाणी कमी पडल्याने परत पाणी ओतले. असे करत करत आख्खा डबा खाली झाला. तोपर्यंत बायको उठून, सोफ्यावर पेपर वाचत बसली होती. ‘‘आलं घालून, स्पेशल चहा करा’’ तिने ऑडर सोडल्यानंतर आमच्या कपाळाची शीर तडतडा उडू लागली. ‘आपण रोज अशीच आॅडर सोडतो’ हे आठवल्याने गप्प बसलो. थोड्यावेळाने बायको अंघोळ करून आल्यानंतर ओला टॉवेल तिने सोफ्यावर फेकून दिला. ‘‘हे काय करतेस?’’ असं ओरडलो पण नंतर जीभ चावली व मुकाट्याने तो टॉवेल उचलून गॅलरीत वाळत घातला. त्यानंतर दोन्ही मुलांना अंघोळ घालायला नेले. त्यांनी बाथरूममध्ये एवढा गोंधळ घातला, की दोन धपाटे त्यांना लगावले.

मात्र, गप्प बसण्याऐवजी त्यांनी भोकांड पसरले. डोकं अगदी उठून गेलं. नाश्‍त्याला पोहे करायला घेतले पण कांद्यांनी एवढं रडवलं, की बोलायची सोय नाही. पोहे नीट भिजवून कढईत टाकले. पण त्याचा सगळा लगदा झाला होता. शेवटी उपीट केलंय, असं सांगून बळंबळं खायला घातलं. त्यानंतर धुणी- भांडी केली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर कसंतरी जेवण बनवलं. जेवणानंतर पुन्हा भांडी घासली व लादी पुसली. हे काम करतानाच आमची कंबरडं मोडलं. त्यावेळी बायको व्हॉटसअपवर व फेसबुकवर होती. पण तिला बोलायची सोय नव्हती. आमचं वागणं असंच असायचं. दिवसभर काम करून आमचा पिट्टा पडला होता. खूप थकलो होतो. तसाच बेडवर जाऊन पडलो. त्यानंतर कपाळाला बाम आणि पाठीला आयोडेक्स बायको चोळू लागली.
‘‘सवय नसल्याने दमलात ना.’’ असं म्हणून ती पाय चेपू लागली.
बायको रोज आॅफिस सांभाळून एवढं घरकाम करते आणि आपण कधीही तिचे पाय चेपले नाहीत की कपाळाला बाम लावला नाही. ‘दमली असशील ना’ हे वाक्य तर आयुष्यभरात एकदाही आपल्या ओठांवर आले नाही,’ हा विचार मनात येताच आम्ही खजिल झालो आणि आमच्या डोळ्यांतून टचकन पाणी आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com