Video : तुकोबारायांच्या पादुका निघाल्या पंढरीच्या वारीला... 

wari.jpg
wari.jpg

देहू : ना टाळ-मृदंगाचा गजर करणाऱ्या दिंड्या...ना लाखो वैष्णवांची मांदियाळी..अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या भेटीसाठी शुक्रवारी (ता. 12) दुपारी सव्वातीन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे परंपरेप्रमाणे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.वीस वारकऱ्यांच्या उपस्थितीत परंपरा जतन करीत मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा झाला. प्रत्येक वारीला लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने भरून जाणारा देऊळवाडा आज सुनासुना होता. परंतु उपस्थित असलेल्या वारकऱ्यांनी केलेल्या "ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने अवघा देऊळवाडा दणाणून गेला. 

पंढरीची वारी आनंद सोहळा 
पुण्य उभे राहो आता 
संताच्या या कारणे 
पंढरीच्या लागा वाटे 
सखा भेटे विठ्ठल 

मानवी जीवाला संतांच्या संगतीने जगण्याची आध्यात्मिक परंपरा म्हणजे वारी. सुख- समाधान हे प्रांपचिक ध्येय सर्व मानवजातीला गरजेचे आहे. मात्र, ते खरे सुख नाही. संतांच्या संगतीत देवाच्या भेटीला जाणे हे खरे सुख आहे. ते पंढरीच्या वारीत आहे, असे तुकाराम महाराज अभंगातून सांगतात. याच भावनेने सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. 

कोरोनामुळे निर्बंध 
यंदा गेल्या तीन महिन्यांपासून सारे जग कोरोनाच्या साथीने हैराण झाले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढलेल्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून यंदाची आषाढी पायी वारी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, गेल्या अनेक वर्षांची परंपरा अबाधित राखण्यासाठी मोजक्‍या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संतांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला नेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार संत तुकाराम महाराज संस्थानने वीस वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान करण्याचा निर्णय घेतला. 

परंपरेप्रमाणे सोहळा सुरू 
परंपरेनुसार पालखी प्रस्थान सोहळ्याचे पारंपरिक कार्यक्रम पहाटे चारपासून सुरू झाले. पहाटे पाच वाजता देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संजय महाराज मोरे यांच्या हस्ते पुजा झाली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरातील महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधूकर महाराज मोरे, विश्वस्त अजित मोरे यांच्या हस्ते झाली. देऊळवाड्यातील भजनी मंडपात सकाळी दहा वाजता पुंडलिक महाराज देहूकर यांच्या पादुका प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने कीर्तन झाले. 

तुझिया संगती। 
झाली आमची निश्‍चिंती।। 

या अभंगावर त्यांनी निरुपण केले. विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. मानकरी म्हसलेकर दिंडी यांनी संबळ, टाळमृदंग गजर आणि तुताऱ्या वाद्यांसह मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आली. दुपारी पावणेतीनच्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. देऊळवाड्यातील भजनी मंडपात संत तुकाराम महाराज पादुका आणि माऊलींच्या पादुकांची विक्रम महाराज माळवे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते महापूजा झाली. देहूतील पुजारी नारायण अत्रे यांनी पौराहित्य केले. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त अजित महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे, संजय महाराज मोरे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पादुका पुजनानंतर फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख यांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुंडलिकवरदा हरी विठ्ठलचा जयघोष करीत पादुकांचे प्रस्थान झाले. देऊळवाड्यातील मंदिर प्रदिक्षणा सुरू झाली. वारकऱ्यांनी टाळमृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष केला. खांद्यावर गरुडटक्के तसेच चोपदार होते. तसेच सेवेकरी नामदेव गिदा, बाळू पांडे, अनिल गायकवाड, नामदेव भिंगारदिवे, गुंडाप्पा कांबळे, लक्ष्मण पवार, तानाजी कळमकर हेही देऊळवाड्यात होते. देऊळवाड्यातील प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पादुका पुन्हा मंदिरात विराजमान करण्यात आल्या. दरम्यान उपस्थित असलेल्या वारकऱ्यांनी केलेल्या हरिनामाच्या जयघोषाने देऊळवाडा दणाणून गेला. 

देहूत दुकाने बंद 
प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे दुकाने बंद होती. परवानगी दिलेल्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. मंदिराकडे येणारे रस्ते बंद केले होते. 

इंद्रायणी घाटावर शुकशुकाट 
आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो भाविक देहूत येतात. दिंड्यांमधून वारकरी इंद्रायणी स्नान करतात. घाटावर भजनाच्या ठेक्‍यात नाचतात. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी असते. कोरोनामुळे निर्बंध घातल्याने यंदा घाटावर शुकशुकाट पाहायला मिळाला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com