दिलासादायक बातमी : ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी झाली यशस्वी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनासह इतर आजार असणाऱ्या रुग्णाला 10 आणि 11 मे या सलग दोन दिवशी दान केलेला 200 मिलीलिटर प्लाझ्मा संक्रमित करण्यात आला. यामुळे या रुग्णाची प्रकृती सुधारली.

पुणे : ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीची पहिली मानवी चाचणी गुरुवारी (ता.२१) यशस्वी झाली. यामुळे अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले, अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीने ससून रुग्णालयात सर्वप्रथम प्लाझ्मादान केले. रक्तातील एक घटक असलेल्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. कोरोना विषाणूंच्या विरोधात लढण्याची शक्ती शरीराला या अँटीबॉडीजमधून मिळते. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीने दान केलेल्या प्लाझ्मा कोरोनाबाधीत रुग्णाला दिला जातो. त्याला प्लाझ्मा थेरपी म्हणतात. 

- आता घरबसल्या मिळणार पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके; 'बालभारती'कडे करा 'ऑनलाईन ऑर्डर'!

ससून रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेला अत्यवस्थ रुग्णावर ही चाचणी करण्यात आली. या रुग्णाला उच्च रक्तदाब होतो. हायपोथायरॉईडीझम आणि स्थुलता असे आजार होते. अशा आजारांच्या रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू होत असल्याचे आतापर्यंतचे निरीक्षण होते.

कोरोनासह इतर आजार असणाऱ्या रुग्णाला 10 आणि 11 मे या सलग दोन दिवशी दान केलेला 200 मिलीलिटर प्लाझ्मा संक्रमित करण्यात आला. यामुळे या रुग्णाची प्रकृती सुधारली. रुग्णाला व्हेंटीलेटवरून बाजूला करण्यात आले. प्लाझ्मा थेरपीनंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी रुग्ण स्वतः श्वासोच्छवास घेऊ लागला. तर पंधराव्या दिवशी संसर्ग बरा झाला. रुग्णाची प्रयोगशाळेतील चाचणीतून रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले, असेही डॉ. तांबे यांनी सांगितले. 

- Big Breaking : पुण्यात कोरोनाचा हाहाकार; रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक!

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी या बाबतचा प्रस्ताव आयसीएमआरला पाठविला होता. त्यानंतर देशातील प्लाझ्मा थेरपीच्या मानवी चाचण्या परवानगी दिलेल्या देशातील पहिल्याच चार केंद्रांमध्ये पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश होता. त्या पार्श्वभूमीवर डॉ. चंदनवाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “पहिल्या यशस्वी चाचणीमुळे कोरोनाशी लढण्याची ताकद वैद्यकीय तज्ज्ञांना मिळेल, असा आशेचा किरण दिसू लागला आहे. त्यामुळे कोरोनावर प्रभावी उपचाराची पद्धत यातून मिळेल.”

- पुण्यातील गणेश मंडळांचा 'तो' निर्णय स्वागतार्ह; राज्यातील सर्व गणेश मंडळांना उपमुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन!

संशोधन पुढे सुरू राहणार
ही आता फक्त एक चाचणी यशस्वी झाली आहे. देशभरातील 25 केंद्रांवर प्लाझ्मा थेरपी सुरू आहे. या सर्व केंद्रांमधील थेरपीची माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) संकलित करेल. त्याच्या विश्लेषणानंतर प्लाझ्मा थेरपी खरंच उपयुक्त आहे का, या प्रश्नाचं निश्चित शास्त्रीय उत्तर मिळेल, असे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. 

- पुणे जिल्ह्यातील 'हा' तालुका 'सातच्या आत घरात'; कंटेन्मेंट झोनमध्येही केले बदल!

“प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाबाधीत रुग्ण धोक्यातून बाहेर आला. त्याची प्रकृती सुधारत आहे. रुग्णाला आता वाँर्डमध्ये हलविण्यात आले. लवकर त्याला घरी सोडण्यात येईल,”
- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sassoon hospital claims that plasma therapy was successful on Covid 19 patient