वर्ष उलटून गेलं तरी दुसरी यादी जाहीर होईना; 'पीएचडी'च्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा कायम

Students_PhD
Students_PhD

पुणे : "जुलै २०१९ मध्ये पीएचडीची पात्रता परीक्षा दिली होती. यात मी उत्तीर्ण झालो, त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये माझी मुलाखत होऊन विषय आणि गाईड ठरणे अपेक्षित होते. मात्र, एका वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून देखील अद्याप दुसरी यादी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे जाहीर केलेली नाही. यामध्ये वेळ वाया जात असून पीएचडी पूर्ण करण्यासाठी उशीर होणार आहे, असे सचिन (नाव बनलेले आहे) सांगत होता. 

पुणे विद्यापीठाची 'पीएचडी' प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी 'पेट' (पीईटी) ही परीक्षा देतात. दरवर्षी साधारणपणे जुलै महिन्यात ही परीक्षा घेतली जाते. त्यानंतर त्याचा निकाल जाहीर करून प्रवेशासाठी पहिली यादी जाहीर केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना गाईड देणे आणि विषय ठरवणे हा महत्त्वाचा टप्पा पार पडतो. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर चार महिन्यांमध्ये दुसरी यादी जाहीर करणे अपेक्षित असते.

मात्र, पुणे विद्यापीठाला ही दुसरी यादी अद्याप जाहीर करता आलेली नाही. नियोजित वेळापत्रकानुसार मार्च २०२० पर्यंत दुसरी यादी जाहीर होणे गरजेचे होते. पण कोरोनामुळे सर्व प्रक्रिया ठप्प झाली. तीन-चार महिने यावर काहीच झाले नाही. दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुणे विद्यापीठाचे कार्यालयीन व शैक्षणिक कामे पूर्ववत होत आहे. याच काळात विद्यापीठाने अडीच लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या, नवीन वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रियाही पार पाडली. परंतु पीएचडी पात्रता धारकांची दुसरी यादी अजूनही जाहीर केलेली नाही. याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. 

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण म्हणाले, "कोरोनामुळे दुसरी यादी जाहीर करण्यास विलंब झालेला आहे, पण आता स्थिती काहीशी निवळल्याने दुसऱ्या यादीतील मुलाखतींचे वेळापत्रक येत्या एक ते दोन दिवसांमध्ये जाहीर करू."

"मार्च महिन्यापर्यंत पीएचडी पात्रताधारकांची यादी जाहीर होणे आवश्यक होते, पण ती झाली नाही. कोरोनामुळे आमचा बराच काळ वाया गेला. त्यानंतर आता गेल्या तीन महिन्यापासून सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने आम्ही दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करत आहोत. याबाबत विद्यापीठाकडे चौकशी केली असता लवकरच परिपत्रक काढू असे उत्तर दिले जाते, पण काहीच निर्णय घेतला जात नाही."
- राजेश, विद्यार्थी

यादी विलंबाचे परिणाम 
- पीएचडीसाठी पात्र ठरूनही गेल्या वर्षभरापासून संशोधन सुरू करण्याची प्रतिक्षा
- दोन्ही यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पीएचडी कोर्स वर्क करता येते, त्यामुळे पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांचाही खोळंबा. 
- प्रक्रियेलाच उशीर होत असल्याने पीएचडीसाठी कालावधी जास्त लागणार 
- यंदाच्या वर्षीच्या 'पेट'चे नियोजन बिघडले.

पीएचडीसाठी एकूण जागा - सुमारे ३३००
पहिल्या फेरीत निवड झालेले - सुमारे १८००
दुसऱ्या फेरीतील प्रतिक्षेत - सुमारे १५००
पीएचडीसाठी विषय - सुमारे १००
पीएचडीचा कालावधी - तीन ते सहा वर्ष

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com