शास्त्रज्ञ म्हणताहेत, 'पुण्यात कोरोनाची दुसरी लाट रोखणे शक्‍य!'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या सिरो सर्वेक्षणाच्या पुढील संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

पुणे : शहरातील त्या पाच प्रभागांमध्ये कोरोनाविरुद्ध समूह रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित झाल्याचे अखेर सिद्ध झाले आहे. कमी अधिक प्रमाणात शहरातील सर्वच प्रभागांत अशी स्थिती असू शकते. योग्य खबरदारी घेतल्यास कोरोनाची दुसरी लाट रोखणे शक्‍य होईल, असा विश्‍वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. 

अप्रत्यक्षरीत्या तरी समूह रोगप्रतिकारशक्ती असल्याचे सिद्ध झालेले पुणे हे देशातील पहिले शहर ठरले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या सिरो सर्वेक्षणाच्या पुढील संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे. येरवडा, कसबा पेठ - शनिवार पेठ, रास्ता पेठ - रविवार पेठ, लोहियानगर - कासेवाडी आणि नवीपेठ - पर्वती या पाच प्रभागांतील नागरिकांच्या रक्ताचे नमुने सिरो सर्वेक्षणात घेण्यात आले होते. 

शाळा सुरू करण्यास परवानगी, पण...;जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

सर्वेक्षणातून 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लोकसंख्येला कोरोना होऊन गेल्याचे सिद्ध झाले होते. परंतु, संबंधित नागरिकांच्या रक्तातील प्रतिपिंडे कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी सक्षम आहे का नाही, याबद्दल साशंकता होती. परंतु, नव्याने झालेल्या संशोधनातून सरासरी 85 टक्के नागरिकांमधील प्रतिपिंडे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. संबंधित संशोधनात आयसरचे डॉ.अर्नब घोष, फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स आणि टेक्‍नॉलॉजी इंस्टिट्यूट (टीएचएसटीआय)चे संकर भट्टाचार्य, विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाच्या डॉ. आरती नगरकर, डॉ. अभय कुडाळे आदींचा सहभाग आहे. संबंधित संशोधन मेडिकल आर्काईव्ह या प्रकाशनपूर्व शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. 

Corona Updates: कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनानं कसली कंबर; विशेष उपाययोजनांवर भर!​

संशोधनाचे निष्कर्ष :
- संबंधित प्रभागात कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींमधील प्रतिपींडे विषाणू विरुद्ध लढण्यासाठी सक्षम 
- प्रभागांत सरासरी 51.5 टक्के हर्ड इम्युनिटी विकसित झाली असे म्हणता येईल 
- विकसित झालेली हर्ड इम्युनिटी किती काळ टिकेल याबद्दल अजूनही संशोधन नाही 
- सर्वेक्षणात ज्या प्रभागातील सर्वाधिक लोकसंख्येत प्रतिपींडे सापडले तेथे नंतर कोरोना बाधितांचे प्रमाण कमी मिळाले. तर जेथे कमी लोकसंख्येत प्रतिपिंडे सापडली तिथे नंतर तुलनेने जास्त बाधितांचे प्रमाण सापडले.

संशोधनाच्या मर्यादा :
- सध्या अप्रत्यक्षरीत्या हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचे स्पष्ट होते 
- दोन प्रभागांतील लोकसंख्येमध्ये हर्ड इम्युनिटीच्या प्रमाणाता मोठे अंतर असण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी सर्वेच प्रभागांत सिरो सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. 

Positive Story: पुण्यात विकसित होतेय 'हर्ड इम्युनिटी'; जाणून घ्या कशी करते काम

कोरोनाविरुद्धची प्रतिपिंडे असलेली लोकसंख्या (टक्के) : प्रभागानुसार :
1) येरवडा : 55.5 
2) कसबा पेठ - सोमवार पेठ : 35.8 
3) रास्ता पेठ - रविवार पेठ : 44.1 
4) लोहियानगर - कासेवाडी : 66.4 
5) नवीपेठ - पर्वती : 54.1 

राहण्याचे ठिकाण :
झोपडपट्टी : 59.2 
इतर : 34.4

सर्वेक्षणात ज्या लोकांच्या शरिरात प्रतिपींडे सापडली होती. त्यातील 85 टक्के लोकांमधील प्रतिपींडे कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाची दुसरी लाट थोपविणे शक्‍य होणार आहे. नागरिकांनी अधिकची काळजी घेतली तर पुण्याची दिल्ली होणार नाही. 
- डॉ. आरती नगरकर, शास्त्रज्ञ, आरोग्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. 

पर्सिस्टंट फाउंडेशनच्या आर्थिक मदतीमुळे आम्ही हे करू शकलो. अधिक ठोस निकषांसाठी आणि भविष्यातील साथरोग नियंत्रणासाठी अशा सिरो सर्वेक्षणांची व्याप्ती वाढवावी लागेल. त्यासाठी प्रशासनाने निधी उपलब्ध करायला हवा आणि संशोधकांनीही समन्वय ठेवत काम करणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. अर्नब घोष, शास्त्रज्ञ, आयसर, पुणे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scientists believe that with proper precautions second wave of corona can be prevented in Pune