तुम्ही कोरोना तर घेऊन आला नाही ना? सगळ्यांची स्क्रिनिंग होणार!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

भाजी मंडई सुरू झाल्यानंतर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव होण्याचा गंभीर धोका असतानाही नागरिक अनावश्यकपणे दुचाकी व चारचाकी वाहनांद्वारे ये जा करीत होते.

दौंड : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे आणि मुंबईवरून दौंड तालुक्यात आलेल्या नागरिकांचे स्क्रिनिंग सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नोकरी, व्यवसाय, उद्योग, शिक्षण आदी कारणांमुळे पुणे व मुंबई येथे गेलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर दौंड तालुक्यातील आपल्या मूळ गावी परतले आहेत. त्यांच्या या शहरांमधील वास्तव्य दरम्यान त्यांना लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांचे स्क्रिनिंग सुरू करण्यात आले. स्क्रिनिंग अंतर्गत अशा नागरिकांना सतत सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असल्यास तपासणी करून उपचार केले जात आहेत व त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

- लॉकडाऊनला नागरिक गांभीर्याने घेत नाहीत : मोदी

पुणे व मुंबई येथे कोरोना संशयित किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले असल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुणे येथे पुढील उपचारांसाठी पाठविले जाणार आहे. आरोग्य सेवक व आशा वर्कर यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन माहिती संकलन करून नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे.

स्वतःच्या जीवासाठी तरी घरी थांबा

जमावबंदी आदेशाचा भंग करत अनेक नागरिक शहरात विनाकारण फिरताना दिसत आहेत. त्यामुळे स्वतःच्या जीवासाठी तरी घरी थांबा, असे कळकळीचे आवाहन दौंड पोलिसांनी केले आहे. शहरात जमावबंदीचा भंग करणाऱ्या अल्पवयीन मुलांकडील वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच बेशिस्तपणे वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई केली आहे. 

- Coronavirus : 'माँ तुझे सलाम'; इटलीतील भारतीयांना सुखरूप मायदेशी घेऊन येणारी 'मर्दानी पायलट'!

दौंड शहरात सोमवारी (ता.२३) सकाळी भाजी मंडई सुरू झाल्यानंतर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव होण्याचा गंभीर धोका असतानाही नागरिक अनावश्यकपणे दुचाकी व चारचाकी वाहनांद्वारे ये जा करीत होते. अल्पवयीन मुले ट्रिपल सीट फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी शहराच्या शालीमार चौक ते कुरकुंभ रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिस पथकासह अनावश्यकपणे ये-जा करणाऱ्यांवर कारवाई केली. दौंड पोलिस ठाण्यासमोर फौजदार नितीन मोहिते व पोलिस पथकाने वाहनचालकांवर कारवाई केली. 

- केंद्र सरकारची मोठी घोषणा; देशातंर्गत विमानसेवा करणार बंद!

नगर पालिका आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांनी ध्वनिवर्धकाद्वारे गर्दी करणाऱ्यांना घरी जाण्याच्या सूचना दिल्या. पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या वाहनातून सायरन वाजवून आणि ध्वनिवर्धकाद्वारे गर्दी न करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे; परंतु नागरिक त्याचे गांभीर्याने पालन करत नव्हते.

- कोरोनाच्या जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Screening has been started to prevent coronary infection and outbreaks in Daund