केंद्र सरकारची मोठी घोषणा; देशातंर्गत विमानसेवा करणार बंद!

वृत्तसंस्था
सोमवार, 23 मार्च 2020

केंद्र सरकारच्या सूचनांनंतरच आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू करण्यात येतील. याबाबतची अधिकृत माहिती आम्ही वेळोवेळी देत राहू, अशी माहितीही दिल्ली विमानतळ प्रशासनाने दिली आहे.​

नवी दिल्ली : दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. जनता कर्फ्यूनंतर लोकांनी रस्त्यावर उतरत जल्लोष साजरा केला. त्यामुळे फक्त एक दिवसाच्या बंदने काही होणार नाही, याची कल्पना बहुधा सरकारला आली असावी. कोरोना व्हायरसचा उद्रेक लक्षात घेता केंद्र सरकारने सोमवारी (ता.२३) एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येत्या बुधवारपासून (ता.२५) देशांतर्गत विमान वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे येत्या २४ तारखेपासून व्हीव्हीआयपी व्यक्ती वगळता इतर कोणालाही देशांतर्गत विमान प्रवास करता येणार नाही. देशातर्गत प्रवासी विमान वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विमानाद्वारे करण्यात येणाऱ्या मालवाहतूकीवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमान उड्डाणे बंद करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीला केंद्र सरकारने पाठिंबा दर्शविला आहे.

- Coronavirus : 'माँ तुझे सलाम'; इटलीतील भारतीयांना सुखरूप मायदेशी घेऊन येणारी 'मर्दानी पायलट'!

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४१५ पर्यंत पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आयजीआय) च्या टर्मिनल ३ वर परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व विमानांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. नुकत्याच परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आणि येत्या २९ मार्चपर्यंतची सर्व विमान उड्डाणे बंद ठेवण्यात आल्याची माहिती दिल्ली एअरपोर्टने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

- Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी; रूग्णाची संख्या...

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी आतापर्यंत ज्या डॉक्टर आणि विमानतळ कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांचे धन्यवाद. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर केंद्र सरकारच्या सूचनांनंतरच आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू करण्यात येतील. याबाबतची अधिकृत माहिती आम्ही वेळोवेळी देत राहू, अशी माहितीही दिल्ली विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

- लॉकडाऊनला नागरिक गांभीर्याने घेत नाहीत : मोदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commercial airlines shall cease with effect from midnight on March 24 declared Govt of India