#WeCareForPune : ‘कोरोना’चा धोका : सिंहगड रस्ता परिसरातील रहिवाशांचे स्क्रिनिंग

नारायण पेठ - पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर नागरिक स्वतःची काळजी घेऊ लागले आहेत. संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क लावूनच घराबाहेर पडत आहेत.
नारायण पेठ - पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर नागरिक स्वतःची काळजी घेऊ लागले आहेत. संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क लावूनच घराबाहेर पडत आहेत.

पुणे - पुणे शहरात ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झालेले पाच जण आढळल्यानंतर ‘त्या’ परिसरात महापालिका, महसूल आणि आरोग्य विभागाने एकत्रित येत बुधवारपासून तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. संसर्ग झालेले रुग्ण राहत असलेल्या सोसायटी आणि त्याशेजारील एक सोसायटीतील नागरिकांची आरोग्य तपासणी (स्क्रिनिंग) आज या तिन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितरीत्या केली. ही मोहीम या सोसायटीच्या तीन किलोमीटरच्या परिघात यापुढेही सुरू राहणार आहे.

दुबईहून पुण्यात आलेल्या दोन जणांना ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याचे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. त्यानंतर काल आणखी तीन जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आल्याने ही संख्या पाचवर गेली. 

या विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे; तसेच या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये राहत होते. त्या सोसायटी आणि परिसरातील या रुग्णांच्या संपर्क आलेल्यांची एकत्रित तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते.

त्यानुसार आज महापालिकेचे आरोग्य अधिकारी, पोलिस आणि तलाठी यांनी आज सकाळी सिंहगड रस्त्यावरील ती आणि त्याच्या शेजारील फोरिना सोसायटी अशा दोन सोसायट्यांतील सुमारे ६१० सदनिकांना भेट देऊन स्क्रिनिंग केले. दुपारी दोनपर्यंत या तपासणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. या दोन्ही सोसायट्यांमध्ये परदेशवारी करून आलेले कोण नागरिक आहेत, या विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे कोणाला आहे का, यांची माहिती या पथकाने घेतली. त्याचबरोबरच कोरोना विषाणूसंदर्भातील माहिती तेथील रहिवाशांना देत कोणती काळजी घ्यावी, यांचे मार्गदर्शन केले. तपासणी अहवाल सायंकाळी या पथकाने तहसीलदारांकडे सुपूर्त केला.

दिव्यांगांसाठीच्या स्पर्धा पुढे ढकलल्या
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडीतील छत्रपती शिवाजी क्रीडासंकुलात होणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या राज्यस्तरीय स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. या स्पर्धा येत्या ऑक्‍टोबरमध्ये घेऊ, असेही त्यांनी सांगितले. १४ व १५ मार्चला दिव्यांगांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत, त्याचाच भाग म्हणून या स्पर्धा आता पुढे ढकलण्यात येत असून, त्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

पिंपरीत पाच जण तपासणीसाठी दाखल
पिंपरी : दुबईवरून परतलेले शहरातील तीन नागरिक आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या दोन, अशा पाच संशयितांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी करण्यासाठी बुधवारी (ता. ११) सकाळी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापालिकेने कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी तळमजल्यावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) सुरू केला आहे. त्यांना तेथे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तपासणीसाठी दाखल केलेल्या रुग्णांना कोरोना विषाणूंच्या तपासणीसाठी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. वायसीएममध्ये सुरू केलेल्या स्वतंत्र विलगीकरण कक्षाची क्षमता दहा बेडची आहे.

फुरसुंगीची यात्रा रद्द
फुरसुंगी : फुरसुंगी गावाची यात्रा ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाचा विचार करून रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाच्या आज गावात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुणे शहरातही ‘कोरोना’चे काही रुग्ण आढळल्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करून मोठी गर्दी होणारे कार्यक्रम शक्‍यतो रद्द करण्याचे आवाहन केले होते. त्याबाबत ३० आणि ३१ मार्च या दोन दिवशी होणाऱ्या ग्रामदैवत शंभू महादेवाच्या यात्रेबाबत निर्णय घेण्यासाठी हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन कुंभार व ग्रामस्थांची आज सकाळी महादेव मंदिरात बैठक झाली. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव पाहता यात्रेसाठी गावात मोठी गर्दी होणे हितकारक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com