पुणे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या डोसला प्राधान्य; अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

पुणे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या डोसला प्राधान्य; अजित पवार

पुणे - ‘कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांचा पहिला डोस झाल्यानंतर दुसऱ्या डोसची मुदत उलटून जात आहे. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे पहिल्या डोससाठी नागरिकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या आठ महिन्यांत पुणे शहरासह जिल्ह्यातील ७१ लाख ३९ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण केवळ १८ लाख ६५ हजार एवढे आहे, तर एक डोस घेतलेल्यांची संख्या ५२ लाख ७३ हजार एवढी आहे. लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग कमी असल्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने शुक्रवारी दिले होते. दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: पुणे-पिंपरीत रविवारी पीएमपीच्या जादा ३०० बस

पवार म्हणाले, ‘जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असून, ही समाधानाची बाब आहे. मात्र, तपासण्यांची संख्या कमी करू नका, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पुरेशी लस उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘टास्क फोर्स’ने केलेल्या सूचनेनुसार पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ठरलेल्या मुदतीत दुसरा डोस मिळत नाही. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्याने दुसरा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

राज्यातील सर्व नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण झाल्यानंतरच त्यांना ‘बूस्टर डोस’ देण्याबाबतचा विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यासाठी लस प्राधान्याने उपलब्ध करून देण्याबाबत विभागीय आयुक्तांची सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जादा लस उपलब्ध झाल्यास झोपडपट्टीतील नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.

- अजित पवार, पालकमंत्री

हेही वाचा: पुणे पोलिसांना विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधनानिमत्त राख्यांची भेट

‘भारत बायोटेक’ला विनंती करणार

भारत बायोटेक या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीला मांजरी येथील जागा देण्यात आली आहे. त्याबाबत अजित पवार म्हणाले, ‘‘ज्या दिवसांपासून या कंपनीकडून लस निर्मिती सुरू होईल. त्या दिवशी त्यांना पुण्यासह महाराष्ट्राला प्राधान्याने लस उपलब्ध करून देण्याबाबतची विनंती करण्यात येईल.’’

पुण्यात बाधितांचा दर २.५ टक्क्यांवर

पुणे शहरात कोरोनाबाधितांचा दर हा २. ५ टक्क्यांवर आला आहे, तर मुत्युदर २.३ टक्क्यांवर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हे प्रमाण अनुक्रमे ३.१ टक्के आणि १.४ टक्के आहे, तर ग्रामीण भागात हे प्रमाण ३.९ टक्के आणि १.२ टक्क्यांवर आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Web Title: Second Dose Priority In Pune District Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ajit PawarPriority