Positive Story : शेतकऱ्यांच्या हाकेला धावून आला जिल्हाधिकारी; धान्याला मिळवून दिला योग्य भाव!

वृत्तसंस्था
Wednesday, 14 October 2020

खासगी व्यापाऱ्यांनी आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून ११०० रुपये प्रति क्विंटल दराने धान्य खरेदी करण्यास सुरवात केली, ज्या धान्याची किमान आधारभूत किंमत १८६८ रुपये प्रति क्विंटल होती.

पिलिभित : बाजार समितीमध्ये किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीत (एमएसपी) धान्याची खरेदी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बाजार समिती गाठली. जिल्हाधिकाऱ्यांनी टाकलेल्या या धाडीमुळे तेथील अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. जेव्हा स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी धान्य खरेदीबाबत चौकशी केली, तेव्हा त्यांनाही किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीत धान्य खरेदी केले जात असल्याचे आढळून आले. त्यावेळी त्यांनी धान्य खरेदी एजन्सीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत तीन अधिकाऱ्यांना निलंबितही केले. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवत आपल्या जिल्हाधिकाऱ्याचे अभिनंदन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

Unlock 5: शाळा ते सिनेमागृहापर्यंत, 15 ऑक्टोंबरपासून काय होईल सुरु?​

पुलकित खरे असं या जिल्हाधिकाऱ्याचे नाव असून ते पिलिभित येथे कार्यरत आहेत. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे धान्य खरेदी केले जात नव्हते. ज्या शेतकऱ्यांचे धान्य खरेदी केले जात होते, तेदेखील अत्यंत कमी दराने खरेदी केले जात होते, अशी माहिती त्यांना मिळाली होती. गेल्या १० दिवसांत फक्त ७०० क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले होते. याबाबत पिलिभित कृषी उत्पन्न समिती येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या धान्य खरेदी केंद्राविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी खरे यांनी राज्य शासनाला शिफारसी पाठविल्या आहेत.  

कर्मचारी कल्याण निगम (केकेएन), यूपी को-ऑपरेटिव्ह युनियन (पीसीयू) आणि यूपी को-ऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड (पीसीएफ) यांच्या धान्य खरेदी केंद्रांवर हुकुमशाहीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. याची दखल घेत खरे यांनी बाजार समितीला अचानक भेट दिली. पीसीयूचे केंद्र प्रभारी अनुज कुमार, केकेएनचे शिवराज सिंह आणि पीसीएफचे सर्वेश कुमार यांनी १७% पेक्षा जास्त आर्द्रता असल्याचा बहाणा करत धान्य खरेदी करण्यास नकार देत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी खरे यांच्या निदर्शनास आले.

जीडीपीच्या शर्यतीत बांग्लादेशही टाकणार भारताला मागे; IMFचा धक्कादायक रिपोर्ट​

खासगी व्यापाऱ्यांनी आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून ११०० रुपये प्रति क्विंटल दराने धान्य खरेदी करण्यास सुरवात केली, ज्या धान्याची किमान आधारभूत किंमत १८६८ रुपये प्रति क्विंटल होती. जिल्हाधिकारी खरे यांनी धान्याची आर्द्रता तपासून पाहिली, तेव्हा ती योग्य असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी एपीएमसी, अन्न आणि विपणन विभाग आणि सरकारी धान्य खरेदीच्या अधिकाऱ्यांनी बाजार समितीत आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे धान्य एमएसपीनुसार खरेदी करण्याचे आदेश दिले. तसेच शेतकऱ्यांना पुन्हा त्रास दिल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर जाग्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

या सर्व प्रकारानंतर जिल्हाधिकारी खरे यांनी धान्य खरेदी यंत्रणेवर नजर ठेवण्याची जबाबदरी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा हा अवतार पाहून टाळ्या वाजवत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pilibhit DM Pulkit Khare suspends three officers for failing to procure paddy at MSP