esakal | उजनीचं पाणी पेटलं; शरद पवारांच्या घराच्या सुरक्षेत वाढ!
sakal

बोलून बातमी शोधा

उजनीचं पाणी पेटलं; शरद पवारांच्या घराच्या सुरक्षेत वाढ!

उजनीचं पाणी पेटलं; शरद पवारांच्या घराच्या सुरक्षेत वाढ!

sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती : उजनीच्या पाणी प्रश्नावरुन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानासमोर आंदोलन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोविंदबागेसमोर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.(security stepped up in front of Sharad Pawar Govind Baug residence in Baramati two protesters arrested Ujjain water issue)

आज सकाळी गोविंदबागेसमोर उजनीच्या पाणी प्रश्नावर आंदोलनासाठी निघालेल्या नागेश भारत वनकळसे (रा. मोहोळ, जि. सोलापूर) व महेश दामोदर पवार (रा. कोथाळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना आज तालुका पोलिसांनी माळेगावमध्येच ताब्यात घेतले. गोविंदबागेसमोर आंदोलन होऊ नये या उद्देशाने पोलिसांनी येथील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून उजनीच्या पाण्याचा प्रश्न पेटला असून सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये वादाच्या ठिणग्या उडत आहेत. या प्रकरणी लक्ष वेधण्याच्या उद्देशाने आज हे आंदोलन करण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्यांना अगोदरच ताब्यात घेतले. अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानाबाहेरही आज पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: Pune Corona Update: शहरातील १ हजार ५६० कोरोनाबाधितांना डिस्चार्ज

हेही वाचा: पुणे : 115 केंद्रावर लसीकरण, येेथे मिळणार कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूरला 5 टीएमसी पाणी वळवण्याचा निर्णय रद्द करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. मात्र जोपर्यंत तसा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या अतुल खुपसे, माऊली हाळनवर व दीपक वाडदेकर यांच्या समवेत शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी आंदोलन केलं. आंदोलकांनी पंढरपूर-सातारा रस्ता अडवला होता. या मार्गावर टायर जाळत आंदोलकांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

उजनी धरणातील 5 टीएमसी पाण्यावरून सध्या पुणे विरुद्ध सोलापूर जिल्हा असा संघर्ष पेटला आहे. सोलापूर जिल्ह्यानं इंदापूरला हे पाणी वळवण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. सोलापूरमधील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनीही या निर्णयाला विरोध केला होता.

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे मुळचे इंदापूरचे असल्याने त्यांनी उजनीचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता, मात्र राष्ट्रवादीच्याच प्रदेशाध्यक्ष असलेल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द केला. राष्ट्रवादीत देखील या वरुन धुसफूस असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: पुण्यात होम आयसोलेशन राहणार; राज्य सरकारचं स्पष्टीकरण