esakal | शूटिंगसाठी ‘होऊ दे खर्च’!
sakal

बोलून बातमी शोधा

Imali Serial

शूटिंगसाठी ‘होऊ दे खर्च’!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे महाराष्ट्रात चित्रीकरणास बंदी असल्यामुळे विविध वाहिन्यांनी मालिकांचे चित्रीकरण परराज्यात सुरू केले आहे. तेथे जाण्यासाठी कलाकारांसह इतर टीमला वाहिन्या व निर्मात्यांनी विमान प्रवासासह हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनामुळे मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणावर बंदी घातली आहे. त्यामुळे मालिकांमध्ये खंड पडू नये व मागील वर्षाप्रमाणे पुन्हा तेच-तेच भाग प्रेक्षकांच्या माथी न मारण्यासाठी दुसऱ्या राज्यात चित्रीकरण करण्याचा निर्णय विविध वाहिन्यांनी घेतला. त्यासाठी वाहिन्यांसह निर्मात्यांनी ‘होऊ दे खर्च’ म्हणत ‘ग्रीन सिग्नल’ दिला. एवढेच नव्हे तर कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे झी मराठी, स्टार प्रवाह, स्टार प्लस, स्टार भारत या वाहिन्यांवरील जवळपास २५ मालिकांचे चित्रीकरण वेगवेगळ्या राज्यात सुरू झाले आहे. तेथेही कोरोनाबाबतीत निर्बंध असले तरी संचारबंदी वा लॉकडाउन नसल्याने सर्व नियमांचे पालन करून काळजी घेत चित्रीकरण सुरू आहे.

हेही वाचा: लॉकडाउनमध्येही आयटी कंपन्यांचे 'उद्योग'सुरूच

फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी

महाराष्ट्राची वेस ओलांडून परराज्यात चित्रीकरण करत आहोत. हा प्रवास आम्ही फक्त प्रेक्षकांचा मनोरंजनाचा प्रवास खंडित न होता, अजून मनोरंजक व्हावा म्हणून करत आहोत, असे ‘झी मराठी’ या वाहिनीच्या वतीने सांगण्यात आले.

काय आहे ‘बायो बबल’ संकल्पना?

बायो बबल पद्धतीमध्ये सर्वजण एकाच छताखाली, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. तेथून कोणालाही बाहेर जाण्याची वा बाहेरच्या व्यक्तीला आतमध्ये येण्याची परवानगी नसते. येथेच खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध केली जाते. टीममधील कुणाला काही वस्तू लागत असेल तर त्याची लिस्ट केली जाते. ही लिस्ट एकाच व्यक्तीकडे देऊन त्याला बाहेर पाठवून त्या वस्तू आणल्या जातात. त्यानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. अनेक गोष्टी होम डिलिव्हरी पद्धतीनेही मागवल्या जातात.

हेही वाचा: जिद्द आणि इच्छाशक्तीसह ज्येष्ठ नागरिकाची कोरोनावर मात

या आहेत सुविधा

  • सर्व कलाकार आणि तंत्रज्ञाची हॉटेल/रिसॉर्टमध्ये राहण्याची सुविधा

  • सर्वांची दररोज आरोग्य तपासणी

  • सर्वांसाठी कॅब, कार

  • परराज्यात जाण्यासाठी विमान प्रवास

  • सेट आणि रूमची वेळोवेळी स्वच्छता

  • जास्त गर्दी न होण्यासाठी कमी लोकांत काम

चित्रीकरण ही गोष्ट अत्यावश्यक गोष्टींमध्ये मोडत नाही, हे दुर्भाग्य आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात चित्रीकरणाला परवानगी नाकारल्याने आम्हाला दुसऱ्या राज्यात जावे लागले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च होत असून, त्याची जबाबदारी वाहिन्या आणि निर्मात्यांनी घेतली आहे. आम्ही आर्थिक भार सोसत असून, प्रेक्षकांसाठी ‘शो मस्ट, गो ऑन’ सुरू आहे. आम्हाला नियमावली घालून परवानगी दिली असती तर त्यानुसार महाराष्ट्रातही चित्रीकरण करू शकलो असतो.

- श्वेता शिंदे, निर्मात्या

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेचे चित्रीकरण राजकोट येथे सुरू आहे. संपूर्ण टीम कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत आहे. बाहेरच्या व्यक्तीला सेटवर येण्यास तसेच कलाकारांना बाहेर जाण्याची परवानगी नाही. जेवणसुद्धा सेटवरच बनवले जात आहे. राहण्यासाठी प्रत्येकाला वेगळी रूम देण्यात आली आहे. कमी युनिटमध्ये काम केले जात आहे.

- समृद्धी केळकर, अभिनेत्री

loading image