Serum Institute Fire: सीरमच्या आगीतील मृतांची ओळख पटली; दोघे पुण्याचे

टीम ई सकाळ
Thursday, 21 January 2021

 सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

पुणे : कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हडपसरजवळील सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्लांटला गुरूवारी दुपारी सव्वा दोन वाजता लागलेली आग आटोक्‍यात येण्याची चिन्हे असतानाच सायंकाळी पाच जणांचा होरपळून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली. सायंकाळी पाच वाजता आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून कुलींगचे काम सुरू असताना इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पाच जणांचे मृतदेह आढळून आले. 

कोरोनावरील 'कोविशील्ड' या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्युटमध्ये होत आहे. काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या राजदुतांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली होती. तर काही दिवसांपुर्वीच सीरम इन्स्टिट्युटमधून महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात कोवीशील्ड ही लस पाठविण्यात आली. या सगळ्या घडामोडीमुळे सीरमकडे भारतासह संपुर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. 

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया​

 

दरम्यान, गुरूवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सीरमच्या मांजरी येथील "आर-बीसीजी'च्या रोटाव्हायरस लशीच्या उत्पादनासाठी तयार केलेल्या इमारतीमध्ये आग लागल्याची खबर अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार, अग्निशामक दलाच्या सुरूवातीला चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र या गाड्या तेथे दाखल झाल्यानंतर आगीचे प्रमाण जास्त असल्याने तातडीने मध्यवर्ती अग्निशामक केंद्रासह अन्य केंद्रांमधून आणखी आगीचे बंब, पाण्याचे टॅंकर तसेच आग विझविण्यासाठीची अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या ब्रांटो या गाडीसह 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. याबरोबरच अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्यासह वरिष्ठ अग्निशामक दलाचे अधिकारी, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सीरमचे व्यवस्थापकीय संचालक विवेक प्रधान आदींनी घटनास्थळी धाव घेतली. 

शर्यतबंदी उठविण्यासाठी केंद्राने संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैल प्राण्यास वगळावे : डॉ. अमोल कोल्हे​

अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी अग्निशामक दलाने तिसऱ्या मजल्यावर इलेक्‍ट्रीक व फर्निचरचे काम करणाऱ्या चार ते पाच कामगारांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर जवानांनी आग विझविण्याकडे संपुर्णपणे लक्ष्य केंद्रीत केले. तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग इमारतीच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोचली होती. तब्बल तीन ते साडे तीन तास आगीशी झुंज दिल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून इमारतीमध्ये कुलींग करण्याचे काम सुरू करण्यात आले. तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील कुलींग केल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान पाचव्या मजल्यावर पोचले. त्यावेळी त्यांना पाच जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जवानांनी पाचही जणांचे मृतदेह इमारतीच्या खाली आणले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतुन रुग्णालयात पाठविण्यात आले. 

Serum Institute Fire: आग लागली की लावली; घटनेच्या चौकशीची मागणी​

कंत्राटदाराकडील कामगारांचा मृत्यू

अग्निशामक दलाच्या जवानांनी तिसऱ्या मजल्यावर इलेक्‍ट्रीक व फर्निचरचे काम करणाऱ्या पाच कामगारांची सुखरुप सुटका केली होती. दरम्यान, इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पाच मृतदेह सापडले. मृत्यु झालेल्या व्यक्ती सीरमच्या कर्मचारी होते की कंत्राटदाराकडील कामगार याबाबत चर्चा सुरु होती. मात्र मृत व्यक्ती या कंत्राटदाराकडील कामगार असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात काम अग्निशामक दल व पोलिसांकडून सुरू होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute fire 5 casualties says ceo adar poonawala