bhugaon.jpg
bhugaon.jpg

पुण्यातील 'या' गावात उद्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू

बावधन (पुणे) : मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भूगावमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरतोय. अवघ्या महिनाभरातच येथील कोरोना रूग्णांची संख्या अठरावर पोचली आहे. संसर्गाची ही साखळी थोपविण्यासाठी भूगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी मंगळवारपासून (7 जुलै) सात दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कामकाज बंद राहणार असून व्यावसायिकांनीही त्यास प्रतिसाद दिला आहे.

लॉकडाउनच्या काळात भूगाव ग्रामपंचायतीने कोरोना योद्ध्याची भूमिका घेत गरजूंना मदत केली. चेकपोस्टवर पोलिसांना मदत करणे, जंतूनाशकाची फवारणी, परप्रांतियांना सुविधा, सॅनिटायझर तसेच आर्सेनिक गोळ्यांचे वाटप आदि कामे ग्रामपंचायतीने करीत भूगावकरांना कोरोनापासून दूर ठेवले होते. परंतू लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर 10 जूनला भूगावमध्ये माताळवाडी फाट्यावर पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला. आरोग्य, महसूल व पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेत बाधित भाग सिल केला. परंतू अवघ्या एकाच महिन्यात गावातील विविध भागात ही संख्या अठरावर जावून पोचली. त्यातील दहा जण ठणठणीत झाले आहेत.

चार जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. तसेच रिपोर्ट पॉझिटिव्ह पण लक्षणे नसलेले चार जण होम क्वारंटाइन आहेत. तथापि अनेक उपाययोजना करून दररोज एक दोन रूग्णांची भर पडतच आहे. त्यामुळे भूगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी सात दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचा एकमुखी निर्णय घेतला. याबाबत तालुक्यातील पोलिस, महसूल आणि आरोग्य प्रशासनाचीही परवानगी घेतली. या काळात दवाखाने, मेडीकल वगळता गावातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. सकाळी दोन तास दूध मिळणार आहे. तथापि भूगावातून पुढे जाणारा सार्वजनिक रस्ता मात्र सुरळीत चालू राहणार आहे. भूगावकरांनी स्वतःच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी सात दिवस काळजी घेत बिनकामाचे घराबाहेर पडू नये असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
    

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

भूगावमध्ये एकाच महिन्यात अठरा जण कोरोनाबाधित झाले आहेत. हा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामस्थांनी सात दिवस गाव बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. याबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला आहे. या काळात तालुक्याशी निगडीत असलेले जनजीवन सुरळीत राहील. फक्त भूगावमधील दवाखाने, मेडीकल वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. भूगाव ग्रामस्थांना नम्र विनंती की अत्यावश्यक काम असेल तरच मास्क घालून सोशल डिस्टन्स ठेवून बाहेर पडा. नाहीतर घरातच थांबा. कोरोनाला रोखण्यासाठी भूगाव ग्रामपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यास सहकार्य करा.

-निकीता सणस, सरपंच, भूगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com