esakal | बारामतीत बुधवारपासून सात दिवसांचा कडक लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

बारामतीत बुधवारपासून सात दिवसांचा कडक लॉकडाउन

sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती : औषधे, दवाखाना व दूधविक्रीसह एमआयडीसीतील कारखाने वगळता बारामतीत बुधवारपासून (ता. 5) कडक लॉकडाऊनची घोषणा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केली. बारामतीतील कोरोना रुग्णांची साखळी तुटत नसल्याने आता कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासनाचे मत झाल्यानंतर आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दूध विक्री सकाळी सात ते नऊ या वेळेतच करायची असून दवाखाने व औषधांच्या कामासाठी परवानगी देण्यात आली आहे. बारामतीत लॉकडाऊन असला तरी लोक विविध कामांसाठी सातत्याने घराबाहेर पडत असल्याने गर्दी होत होती, त्या पार्श्वभूमीवर आता कोणीही रस्त्यावर यायचे नाही असा आदेशच उपविभागीय अधिका-यांनी काढला आहे. बारामती शहरात जागोजागी पोलिसांची नाकेबंदी करण्यात येणार असून वैद्यकीय व कारखान्याच्या कामाव्यतिरिक्त रस्त्यावर येणा-यांवर कारवाई होणार आहे. नुकत्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत कडक लॉकडाऊन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्या नुसार आज हा निर्णय झाला आहे. व्यापारी प्रतिनिधींसह पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे जिल्ह्याला २० कोटींचा निधी !

....तर कारवाई होईल-रस्त्यावर विनाकारण येणा-यांवर पोलिस कारवाई करतील. वैदयकीय तसेच कारखान्याशी संबंधित काम वगळता इतर कारणांसाठी नागरिकांनी अजिबात रस्त्यावर उतरु नये, प्रशासनास बारामतीकरांनी सहकार्य करावे, हा लॉकडाऊन बारामती शहर व तालुक्यासाठी लागू आहे. पोलिस नाकेबंदी करणार असून न ऐकणा-यांवर कारवाई केली जाईल- दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती.

आंदोलनाचा खैरे यांचा इशारा-बारामतीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने प्रत्येक मंडलात कोरोना चाचणी केंद्रे उभारावीत, अशी मागणी भाजप नेते दिलीप खैरे यांनी केली आहे. कोरोना उपाययोजनेत शहरी-ग्रामीण असा भेदभाव केला जात असून आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट लोकांच्या हाती गेल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे. प्रशासनात समन्वय साधून तात्काळ सुधारणा न झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा खैरे यांनी दिला आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला

loading image
go to top