चला वारीला : सुनी संस्थानिकांची नगरी, का अशी झुरणीची वारी?

phaltan.jpg
phaltan.jpg

Wari 2020 : वारीच्या वाटेने पायी चालताना पुण्यानंतर फलटण हे मोठे गाव. फलटणला अनेक उपमा दिल्या जातात. संस्थानिकांची नगरी, महानुभावांची दक्षिण काशी असे म्हटले जाते. अर्थात येथे माऊलींचे स्वागतही नगरीला साजेसे शाहीच असते. वेशीवर गुलाबपाण्याचे शिंपण, आख्ख्या शहरात रांगोळ्यांच्या पायघड्या, चौकाचौकांत उभारलेल्या स्वागत कमानी... अशा शाही थाटात माऊलींचे जल्लोषात स्वागत होते. येथे ‘विमानतळा’वर सध्या पालखी सोहळा विसावतो. विस्तीर्ण तळ हे येथील वैशिष्ट्य. पहिल्या वर्षी इथे विमानतळावर मुक्काम, हे कळाल्यावर मी उडालोच. विमानतळावर पालखी सोहळा...! नंतर समजले की, हे विमानतळासाठीची आरक्षित जागा आहे. इथल्या पालखीतळाइतका मोठा तळ दुसरा नाही. अर्थात हा तळ कायमस्वरूपी नसेल. देवस्थानकडून या तळासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. त्यावर दरवर्षी काही ना काही विचार सुरू आहे. असो.

आळंदी ते पंढरपूर या पालखी प्रवासात पुण्यानंतर फलटणमध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांना अन्नदान केले जाते. घरोघरी वारकरी जेवू घालतात. माऊलींचे या नगरीत राजेशाही थाटात स्वागत होते. परिसरातील भाविक रात्रभर माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. माऊलींसमोर नतमस्तक होतात. यंदा यातील काहीच नाही. ना गुलाबपाणी, ना रांगोळ्यांच्या पायघड्या, ना स्वागत कमानी. सारे कोरोना नामक महामारीच्या दहशतीखाली घरात बसून आहेत. वारी नसल्याने फलटणकरांमध्ये कमालीची नाराजी आहे. फलटणकर आणि पुणेकरांमध्ये वारीच्या काळात बरेच साम्य दिसून येते. त्यामध्ये अन्नदान हा एक समान धागा आहे. तसेच दुसरा म्हणजे वारकऱ्यांच्या सेवेचा...! पुण्याप्रमाणेच येथेही वारकऱ्यांच्या सेवेसाठी निरनिराळे उपक्रम राबविले जातात. त्यात फलटणकर कायमच आघाडीवर असतात. यंदा माऊलीच नसल्याने फलटणच नाही, तर रस्त्यावरील सर्वच गावांमध्ये उत्साह दिसून येत नाही. सोहळा न आल्याने चैतन्याची अनुभूती जणू लोप पावली आहे की काय असा भास होतो. फलटणकर आज मागच्या वर्षानुवर्षाच्या आठवणींना उजाळा देत असतील. कोरोना महामारीमुळे पायी वारी रद्द करावी लागली, हे सर्वांना मान्य आहे. पण काही गोष्टी अशा असतात, की मनाला कितीही समजवायला गेलात तर ते तात्पुरते समजून घेते, पण फार काळ नाही. पुन्हा आठवण आली बेचे पाढे बारा, अशी अवस्था होऊन जाते.

पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावर फलटणपर्यंत निम्मा प्रवास होतो. यंदा दिवस जाता जाईना, कारण पालखी सोहळाच नाही. सात- आठ वर्षांपूर्वी मी वेगळ्या बातम्यांचे सदर करीत होतो. तेव्हा निरनिराळ्या दिंड्यांमध्ये फिरून वेगळे काही मिळते का, हे पाहायचो. असेच बाबामहाराज सातारकर यांच्या दिंडीत चालताना काही वेगळे वारकरी चालताना दिसले. म्हणून चौकशी केली तर तमिळनाडूमधील चाळीस वारकरी यंदा वारीत चालत असल्याचे समजले. तेव्हा ती बातमी करायची, असे मी ठरविले. त्यांना चालताना गाठले. त्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी ओळख झालेले रघुनाथदास यांना गाठले. त्यांच्या नेतृत्वाखालीच हे तमिळनाडूचे वारकरी वारीत चालत होते. तेव्हा रघुनाथदास म्हणाले, आम्ही चाळीस जण आलो आहोत. बरेच जण अभंग म्हणतात. पण मराठी समजत नाही. त्यामुळे त्यांच्याशी इंग्रजीतच बोलावे लागते. सर्व शिक्षित होते. कोणीही वयस्कर नव्हता... सारे तरुण. वारी ही केवळ वयोवृद्धांसाठी नाही, तर ती तरुणांसाठीही असते, याचे भान परराज्यातील भाविकांमध्ये आहे. या वारकऱ्यांना अभंग पाठ आहेत, पण त्याचा नेमका अर्थ कळत नाही. बरं म्हणतात सुरात... अगदी वारकरी सांप्रदायिक ठेक्‍यात..! त्यामुळे ते ऐकताना कोणीच विचार करू शकत नाही, की हे कोणी वेगळा भाषक माणूस म्हणत आहे. जेव्हा रघुनाथदास यांच्याबरोबर ओळख झाली. तेव्हा नेमका तमिळनाडूला जाण्याचा योग आला. त्यावेळी मी त्यांच्या घरी आवर्जून गेलो होतो. घरात गेल्यावर असे वाटलेच नाही, की आपण तमिळनाडूमध्ये आहोत. घरात छोटे मंदिर, त्यात विठ्ठल- रुक्‍मिणीची लोभस मूर्ती. तेव्हा जाणवले, परराज्यातील भाविकांची निष्ठा किती आहे ते... आपण देवांना गृहीत धरतो. रघुनाथदास यांनी राबविलेले उपक्रम पाहिले आणि थक्क झालो... परराज्यात इतके कोणी करेल, यावर कोणाचाच विश्‍वास बसणार नाही. अफाट काम आहे. संतविचार त्यांनी तामिळमध्ये आणले आहेत. तेथील विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये संत ज्ञानेश्‍वर आणि तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहेत.
एकंदरीत काय... माऊलींची महती विश्‍वात आहे. तिला भाषा, प्रांत कशाचीही आडकाठी नाही.

माऊलींच्या जगात माणुसकीचा धर्म आणि माऊली तत्त्व जगतात. जो कोणी वारीत सहभागी होतो, तो त्या वेळेपासून वारीचा होऊन जातो. म्हणूनच वारीची ही महती अवघ्या जगात पोचली आहे. त्याला जतन करणे आपले काम आहे. पालखीचे कुठे स्वागत कसे होते, यापेक्षा तेथील मुलांवर संस्कार काय आहेत, हे पाहायला हवे. वारी ही संस्कारांची राजधानीच आहे. त्यामुळे त्यात जो सहभागी होईल, तो त्यातच एकरूप होऊन जातो. हेच आहे माऊली नामाचे गारुड. तेच चालविते वारीची वाट. तीही अगदी आनंदाने… यंदा साराच अंधार आहे. वारीचा काळ सुरू असताना वारकरी सुन्न आहेत, तशी गावेही सुन्नच आहेत. ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकरांनी आपल्या मुलाखतीत यंदाच्या वारीला ‘झुरणीची वारी’ अशी उपमा दिली. तीच उपमा राजेशाही थाटात स्वागत करणाऱ्या संस्थानिकांच्या नगरीत होती. येथील ग्रामस्थांची वारकऱ्यांप्रमाणेच सुरू आहे ‘झुरणीची वारी’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com