पवारसाहेबांनी विचारले, माझ्या वेळेच्या कार्यकर्त्यांची तब्येत कशी आहे?

जयराम सुपेकर
Friday, 17 July 2020

शैक्षणिक संकुल, मार्केटयार्ड व अद्ययावत आरोग्य सुविधा, रूग्णालयामुळे बारामती तालुक्यातील सुपे व परिसराचा लवकरच कायापालट होईल, अशी स्थिती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 

सुपे (पुणे) : शैक्षणिक संकुल, मार्केटयार्ड व अद्ययावत आरोग्य सुविधा, रूग्णालयामुळे बारामती तालुक्यातील सुपे व परिसराचा लवकरच कायापालट होईल, अशी स्थिती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. तसेच, माझ्या वेळेचे कार्यकर्ते आता कोण कोण आहेत. त्यांची तब्येत कशी आहे, अशी विचारणा केली. 

काय सांगता, पुणे झेडपीला डाॅक्टर आणि नर्स मिळेना...

बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या नियोजित शैक्षणिक संकुलाची जागा व बांधकामाची पाहणी शरद पवार यांनी आज सायंकाळी केली. त्यांच्या समवेत विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. ए. व्ही. प्रभुणे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव आदी उपस्थित होते. या वेळी माजी सभापती नंदा खैरे, संजय दरेकर, संपतराव जगताप, नितीन जगताप, दत्तात्रेय कदम, दत्तात्रेय पन्हाळे, सचिन चांदगुडे, सुशांत जगताप आदी उपस्थित होते.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या जागेची पाहणी करून इमारत केंव्हा तयार होईल. ग्रामिण भागातील किती विद्यार्थ्यांची सोय होईल, शैक्षणिक सुविधा काय असतील, अशी बारकाईने माहिती पवार यांनी या वेळी घेतली. जनाई उपसा जलसिंचन योजनेचे पाणी नियमीत मिळते का. पाऊस झाला का. या वेळी कोणती पिके घेतली आहेत. ऊस किती लावला आहे. माझ्या वेळेचे कार्यकर्ते आता कोण कोण आहेत. त्यांची तब्येत कशी आहे. अनेक आजी- माजी व जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नावे घेऊन त्यांनी विचारपूस केल्याची माहिती भरत खैरे, शौकत कोतवाल यांनी दिली. 

पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा दुरुस्तीसाठी एवढा निधी मंजूर

या संकुलासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल उद्योजक शंकरराव चांदगुडे यांचे पवार यांनी कौतुक केले. शिक्षणापासून वंचित राहणार असलेल्या मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय येथे होणार आहे. सुप्यात चालू असलेले वरिष्ठ महाविद्यालय, इंग्रजी माध्यमाची शाळा आगामी शैक्षणिक वर्षात या अद्ययावत शैक्षणिक संकुलात सुरू होईल, अशी चर्चा या वेळी झाल्याची माहिती चांदगुडे यांनी दिली.

अजितदादा येऊन गेले अन् प्लॉट संपले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गेल्या पंधरवड्यात दौरा झाला. त्यांनी सुप्याचे रूपडे पालटणार असल्याचे सांगताच दुसऱ्याच दिवशी सुप्यातील अनेक जागा विकल्या गेल्या. ठरावीक भागात आता जागाच शिल्लक राहिली नसल्याचा किस्सा उद्योजक चांदगुडे यांनी पवार यांना ऐकवला अन् एकच हास्य फुलले. पुरंदरमध्ये विमानतळ सुरू झाले तर आणखी फायदा होईल. हा धागा पकडून पवार यांनी याविषयी संबंधित ग्रामस्थांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने भविष्यात सुप्याचे महत्व वाढणार आहे.     
 
 
Edited By : Nilesh J. Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar interacted with activists in Baramati