काँग्रेसमधून ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जा : शशी थरूर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

"काही पक्षबदलू नेते भाजपमध्ये जात असले तरी काँग्रेसला चिंतेचे काही कारण नाही. ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे, काँग्रेसकडे उमेदवारांची कमतरता नाही. पक्षाकडे सक्षम कार्यकर्ते व उमेदवार आहेत," अशा शब्दात काँग्रेसचे खासदार व प्रवक्ते शशी थरूर यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर रविवारी निशाणा साधला.

पुणे : "काही पक्षबदलू नेते भाजपमध्ये जात असले तरी काँग्रेसला चिंतेचे काही कारण नाही. ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे, काँग्रेसकडे उमेदवारांची कमतरता नाही. पक्षाकडे सक्षम कार्यकर्ते व उमेदवार आहेत," अशा शब्दात काँग्रेसचे खासदार व प्रवक्ते शशी थरूर यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर रविवारी निशाणा साधला." सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद खंबीरपणे सांभाळत असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्र व हरियानामध्ये सक्षमपणे निवडणुका लढवू,'' असे ते म्हणाले. 

काँग्रेस भवन येथे ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. थरूर म्हणाले," काँग्रेसची काही तत्व व मूल्य आहेत. त्याच्याशी बांधिल असलेले कार्यकर्ते कठीण काळातही पक्षासोबत राहतील. पक्षांतर करणाऱ्यांची पक्षाशी बांधिलकी नाही. त्यांना काँग्रेसने संधी दिली. ताकद दिली, त्यावर ते मोठे झाले. तेच आता दुसऱ्या पक्षात जाऊन संधी शोधत आहेत. पण त्यामुळे काँग्रेसने घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. काँग्रेसकडे उमेदवारांची कमतरता नाही. मुंबई, पुण्यात इच्छुकांची संख्या मोठी आहे. तशीच स्थिती अन्यत्र आहे.'' 

 आणखी वाचा : शशी थरूर म्हणतात, पंतप्रधान मोदींचा आदर करायलाच हवा

"नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून अमेरिकेत गेले आहेत. पंतप्रधानपदी असलेली कोणीही व्यक्ती परदेशात गेल्यास त्या व्यक्तीला भारताचा पंतप्रधान म्हणून आवश्‍यक मान मिळालाच पाहिजे, त्यांचा अपमान होऊ नये, असे माझे वैयक्तिक मत आहे. या संदर्भाने मी ट्विट केले होते. याच न्यायाने ते भारतात परतल्यानंतर अमेरिकेत जाऊन तुम्ही देशासाठी काय केले, हा प्रश्न विचारण्याचा अधिकारही मला आहे,' असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 
 आणखी वाचा : ...तर पंतप्रधानांना जाब विचारायला हवा : शशी थरूर

सरकारने काश्‍मीरमध्ये टेलिफोन, इंटरनेट बंद केले. संचारबंदी लागू केली. कलम 370 हटविणे व त्यावर राजकारण करणे ही भाजपची चाल आहे. ते यावर मते मागत आहेत, असे सांगून थरूर म्हणाले," आम्ही काश्‍मीरमधील दडपशाही सर्वांसमोर आणू. हे कलम हटविल्यानंतर त्यांनी काश्‍मीरमधील नागरिकांना हीन वागणूक दिली. ही भारतीयता आहे का, हे इतर भारतीयांना मान्य आहे का, यात कुठेही माणुसकी, लोकशाही, काश्‍मिरीयतेचा विचार झालेला नाही. काश्‍मीरमध्ये जे काही झाले, त्यामुळे भारताची बदनामी झाली. त्यामुळेच आम्ही संसदेच्या दोन्ही सभागृहात या विधेयकाला कडाडून विरोध केला. केंद्राने काश्‍मीरमध्ये राजकीय नेत्यांना अटक केली. नागरिकांवर निर्बंध लादले. देशाच्या इतर भागात सरकार असे करू शकते का, मग काश्‍मीरमध्येच का केले. संविधानात बदल करता येतो. ते बदलण्याची एक पद्धत आहे. कलम 370 बाबत सरकारने जे केले, ते योग्य नाही. संविधानात बदल संविधानिक पद्धतीनेच व्हायला हवेत.'' 

 आणखी वाचा : श्रीरामाला देखील त्यांची लाज वाटेल : शशी थरूर

पाकव्याप्त काश्‍मीरच्या मुद्यावर बोलताना थरूर म्हणाले,"आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आम्ही केंद्र सरकारसोबत आहोत. पाकव्याप्त काश्‍मीरवर पाकचा कोणताही हक्क नाही. त्यांना एक इंचही जमीन दिली जाणार नाही. मात्र, देशांतर्गत ज्या पद्धतीने राजकारण केले जात आहे, त्याला आम्ही कधीही समर्थन देऊ शकत नाही.' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shashi Tharoor Said that who want to get out of Congress can go