esakal | दौंड-वाळूचोरीसाठी वापरले जाणारे २.३६ कोटींचे साहित्य जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

At Shirapur, 17 boats used for sand smuggling have been destroyed.jpg

पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शिरापूर येथील भीमा नदी पात्रात १६ नोव्हेंबर रोजी दौंड उप विभागाचे पोलिस उप अधीक्षक राहुल धस यांनी ही कारवाई केली. महसूल खात्याच्या सोईस्कर दुर्लक्षामुळे नदी पात्रातून अहोरात्र बेसुमार वाळूचोरी केली जात असल्याने ही कारवाई करण्यात आली.

दौंड-वाळूचोरीसाठी वापरले जाणारे २.३६ कोटींचे साहित्य जप्त

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : पुणे ग्रामीण पोलिस दल पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले असून शिरापूर (ता. दौंड) येथे वाळूचोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या १७ बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील ११ सराईत वाळूचोरांविरूध्द या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : पुण्यात मंदिराचे गाभारे भाविकांनी गजबजले; पाडव्याच्या मुहूर्तावर जल्लोषात उघडली मंदिरे 

पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शिरापूर येथील भीमा नदी पात्रात १६ नोव्हेंबर रोजी दौंड उप विभागाचे पोलिस उप अधीक्षक राहुल धस यांनी ही कारवाई केली. महसूल खात्याच्या सोईस्कर दुर्लक्षामुळे नदी पात्रातून अहोरात्र बेसुमार वाळूचोरी केली जात असल्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाईत एकूण २ कोटी ३६ लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यापैकी ९ फायबर बोटी व ८ सक्शन यंत्र असलेल्या बोटी स्फोटाने नष्ट करण्यात आल्या. तर एक जेसीबी यंत्र जप्त करण्यात आले आहे.

हे ही वाचा : आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे खुले झाले महाद्वार 
 
सदर वाळूचोरी प्रकरणी बंडू सातव (रा. शिरापूर, ता. दौंड), गिरीश गोपालदास मूलचंदानी (रा.दौंड), संदीप काळे (रा. शिरापूर, ता. दौंड), विठ्ठल माळवदकर (रा. बाभूळगाव, ता. कर्जत, जि. नगर), दत्ता गायकवाड (रा. जिंती, ता. करमाळा, जि. सोलापूर), हरिभाऊ होलम (रा. शिरापूर, ता. दौंड), नाना गवळी (रा. कानगाव, ता. दौंड), सलमान मूलाणी (रा. भिगवण, ता. इंदापूर), बाळू मोरे व गोविंद मल्हारी भिसे (दोघे रा. शिरापूर, ता. दौंड ) व संदीप उर्फ सॅण्डी कश्मिरे (रा. दौंड) यांच्याविरूध्द दौंड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील बहुतांश वाळूचोरांविरूध्द पुणे व नगर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.
 
पुणे ग्रामीणचे अधीक्षक अभिनव देशमुख, अपर अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक राहुल धस यांच्यासह त्यांच्या पथकातील हवालदार नंदकुमार केकाण, दिपककुमार वाईकर, पोलिस नाईक सुभाष डोईफोडे, विजय पवार, कमलेश होले, कॅान्स्टेबल धनंजय गाढवे व गृहरक्षक दलाचे जवान यांनी या कारवाईत भाग घेतला. बारामती येथील दंगल नियंत्रण पोलिस (आरसीपी) पथक देखील कारवाईत सहभागी झाले होते.