Video : शिवप्रेमींच्या जयघोषाने अवघा शिवनेरी झाला शिवमय

दत्ता म्हसकर
Wednesday, 19 February 2020

शिवनेरीहून शेकडो शिवज्योती राज्याच्या विविध भागात मार्गस्थ झाल्या. गडावर जाताना शिवाजी महाराज, बाल शिवाजी व जिजाऊंच्या वेशातील शिवभक्तांचे दर्शन शिवप्रेमींना होत होते.​

जुन्नर : शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो शिवप्रेमीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या जयघोषाने किल्ले शिवनेरीचा परिसर आज (ता.19)ला दुमदुमून गेला होता. भगवे फेटे टोप्या, शर्ट घालून हातात महाराजांच्या छायाचित्रांचे भगवे झेंडे घेऊन आलेल्या शिवप्रेमीमुळे शिवरायांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी गड अवघा भगवामय झाला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

शिवनेरीहून शेकडो शिवज्योती राज्याच्या विविध भागात मार्गस्थ झाल्या. गडावर जाताना शिवाजी महाराज, बाल शिवाजी व जिजाऊंच्या वेशातील शिवभक्तांचे दर्शन शिवप्रेमींना होत होते.

 

शिवनेरीवर शिवजन्मस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार अमोल कोल्हे, राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी आदी मान्यवर मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थीत होते. यावेळी मान्यवरांचे उपस्थितीत शिवजन्म सोहळा झाला. पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी पाळणा म्हटला नंतर सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. पोलीस पथकाने पारंपरिक वाद्यवृदांत राष्ट्रगीत गायन केले. छत्रपती शिवरायांना बंदुकीच्या फैरीची सलामी देण्यात आली

शिवजन्मभूमीची झळाळी वाढविणार : उद्धव ठाकरे 

दरम्यान, सकाळी सात वाजता विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर शिवाई देवी मंदिर ते जन्मस्थानापर्यत वाजतगाजत पालखी सोहळा काढण्यात आला. किल्ल्यावरील विविध वास्तुंना फुलांची आकर्षक सजावट तसेच विदुयत रोषणाई करण्यात आली होती. हातात भगवा झेंडा घेऊन 'जय जिजाऊ जय शिवराय', 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देत शिवभक्त दिवसभर गडावर येत होते. शिवजन्मस्थानी आदिवासीं विद्यार्थ्यांच्या 101 शिवबा सलामी,तलवार बाजी,मर्दानी खेळ आदी कार्यक्रमानी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

शिवनेरीची ‘शिवसुमन’ आता रायगडावर

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नरच्या पंचलिंग चौकातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्या जवळचा परिसर भगवे झेंडे व ढोल ताशांचे गजराने शिवमय झाला होता. शिवजयंतीसाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांसाठी करण्यात आलेले वाहनतळ सकाळीच वाहनांच्या गर्दीने भरले होते. दिवसभर शिवभक्त मोठ्या संख्येने शिवनेरीवर येत होते.
Video : शिवराई नाणं आजही खणखणीत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv jayanti celebrated at Shivneri in presence of CM Uddhav thackeray and ajit pawar