esakal | पडळकरांना उमेदवारी दिल्यास आमचं ठरलंय; शिवसेनेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Gopichand-Padalkar-BJP

धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने बारामतीतून पडळकरांना रिंगणात उतरवून अजित पवार यांना शह देण्याचा भाजपचा या मागचा प्रयत्न असल्याचे दिसते. 

पडळकरांना उमेदवारी दिल्यास आमचं ठरलंय; शिवसेनेचा इशारा

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने गोपीचंद पडळकर हे रिंगणात उतरणार असल्याचे सोमवारी (ता.30) खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केल्यानंतर आता बारामतीत अजित पवार विरुध्द गोपीचंद पडळकर अशी निवडणूक होणार आहे. 

दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघात जर भाजपने स्थानिकांना डावलून बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिली, तर शिवसेना तटस्थ राहिल, असा इशारा शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेंद्र काळे यांनी दिला आहे. यामुळे भाजपची चांगलीच अडचण होणार हेही आता स्पष्ट झाले आहे. 

मूळचे आटपाडीचे असणाऱ्या गोपीचंद पडळकरांची उमेदवारी अनपेक्षित मानली जात आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना थेट बारामतीतूनच रिंगणात उतरविले जाईल, हे अनेकांना वाटलेच नव्हते. धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने बारामतीतून पडळकरांना रिंगणात उतरवून अजित पवार यांना शह देण्याचा भाजपचा या मागचा प्रयत्न असल्याचे दिसते. 

बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, पडळकर धनगर आरक्षणाच्या आंदोलनानिमित्त अनेकदा बारामतीत येऊन गेलेले आहेत. उत्तम वक्ते म्हणून त्यांची ख्याती असून भाजपमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर थेट बारामती मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. 

राजेंद्र काळे यांनी मात्र ही उमेदवारी पडळकरांना दिल्याची खात्री नसल्याचे सांगत, भाजपने स्थानिकांना संधी द्यावी, आयात उमेदवार असेल, तर शिवसेना या निवडणूकीत निश्चितपणे तटस्थ राहील असे नमूद केले. 

पक्षाने दिलेला आदेश सर्वांनाच मान्य असून आम्ही आजपासूनच गोपीचंद पडळकरांचे काम करण्यास सुरवात केलेली आहे. त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपचा कार्यकर्ता मनापासून काम करेल. 
- बाळासाहेब गावडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

गोपीचंद पडळकर हे लवकरच बारामतीत दाखल होतील, आम्ही त्यांच्यासमवेत प्रचाराचे नियोजन करणार आहोत. राज्यात भाजपची सत्ता पुन्हा येणार हे निश्चित आहे आणि बारामतीतही सरकारने केलेल्या कामांच्या जोरावर आम्ही जनादेश मागू. 
- दिलीप खैरे, संचालक, महानंद

देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी बारामतीत गोपीचंद पडळकर यांचे काम आम्ही नेटाने करु. पक्षाने दिलेला उमेदवार आम्हाला मान्य आहे व आम्ही पक्षसंघटनेसाठी काम करु. पडळकरांच्या माध्यमातून भाजपने अजित पवारांपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. 
- अविनाश मोटे, जिल्हा सरचिटणीस, भाजप

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- कांद्याची निर्यातबंदी

- किनारपट्टीला धोका कायम : राजनाथ सिंह

- महात्मा गांधी जयंतीनिमित्त सहाशे कैद्यांची सुटका होणार

loading image