esakal | ...तर आढळरावांनी तोंडाला काळे फासावे
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Mohite and Shivajirao Adhalrao Patil

...तर आढळरावांनी तोंडाला काळे फासावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजगुरुनगर - ‘माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे अतिशय खोटारडे असून, ‘सौ चूहे खाकी बिल्ली चली हज को’ अशी त्यांची भूमिका असते. मी जर खेड सभापतींच्या मारहाण (Beating) नाट्यामागे असेल; तर त्यांनी पत्रकारांना (Reporter) सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना सांगावे आणि माझी शक्य तेवढी उच्च पातळीवर चौकशी (Inquiry) करावी. मात्र, त्या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही; तर त्यांनी तोंडाला काळे फासून खेड तालुक्यात यावे,’ असे प्रत्युत्तर आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी दिले. (Shivajirao Adhalrao Dilip Mohite Patil Comment Politics)

खेडच्या सभापतींकडून सदस्यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणात आढळराव पाटील हे सूत्रधार असल्याचा आरोप आमदार मोहिते यांनी केला होता. त्याला आढळराव पाटील यांनी, ‘किरकोळ मारमारीला आमदार मोहिते यांनी अतिरंजित स्वरूप दिले,’ असे उत्तर दिले होते. त्याला मोहिते यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांचे माझ्याबरोबर बोलणे झाले होते आणि, ‘हा वाद बसून आपण सामंजस्याने मिटवू,’ असे ते मला म्हणाले होते. परंतु, त्यांच्याबरोबर बैठक होण्याअगोदरच आढळराव यांनी हा हल्ला घडवून आणला. हल्ल्याचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झालेले आहे. तरीही आढळराव, ‘तसं घडलं नाही,’ असे धादांत खोटे बोलत आहेत. त्यामध्ये पोलिस तपास करत असून, सत्य काय आहे, ते लवकरच समाजापुढे येईल.

हेही वाचा: ‘GST’ मंत्रिगटात अजित पवार यांचा समावेश; कपातीचा आढावा घेण्यासाठी आठ सदस्यीय गट

‘माझ्यावर असलेले विनयभंगाचे गुन्हे राजकीय हेतूने केलेले खोटे गुन्हे होते. त्यामुळे ते पोलिस चौकशीत टिकले नाहीत. त्यामागेही आढळरावच होते. पोखरकर यांच्यावरचे विनयभंगाचे गुन्हे मात्र सत्य असून, आदिवासी सरपंच महिलेचा विनयभंग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईही झालेली आहे. त्यांनी अन्य एका महिलेवरही अत्याचार केलेला आहे. त्यांच्या कार्यालयातील एका अल्पवयीन मुलीशी त्यांचा विवाह झाल्याचीही मला माहिती मिळाली आहे. असा गुंडागर्दी करणारा सभापती तालुक्याला चालेल का? अशा सभापतीचे समर्थन आढळराव करत असतील, तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.’’

‘खेड तालुक्यात शिवसेनेत नेतृत्व शिल्लक राहिले नाही. त्यामुळे आढळराव पाटील हे खेड तालुक्यात येऊन वाईट घटना घडवून वातावरण खराब करण्याचे काम करतात. तालुक्यातील जमिनी खरेदी करून त्यात नफा मिळवतात. तालुक्यात इतरही व्यवसाय करतात. खेड तालुका हा त्यांच्या दृष्टीने सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. म्हणून ते सतत येथे लक्ष घालतात. मी मात्र विकासात गर्क आहे. त्यामुळे अन्य गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे खरोखर वेळ नाही,’’ असेही आमदार मोहिते म्हणाले.

हेही वाचा: मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही - प्रकाश आंबेडकर

शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न

‘जुन्नर पंचायत समिती आढळराव यांच्या हातातून गेली आहे. तेथे आशाताई बुचके आणि त्यांच्यात वितुष्ट आहे. आंबेगावात त्यांचे काही चालत नाही. शिरूरमध्ये तीच परिस्थिती आहे. हडपसर, भोसरी, भोर, वेल्हे येथे तर त्यांचे अस्तित्वच राहिलेले नाही. त्यांनी शिरूर तालुक्यातल्या आमदारांना घरात घुसून मारायची धमकी दिली होती. काही ना काही वाद निर्माण करून शिवसेनेतून बाहेर पडून भाजपमध्ये जाण्यासाठी ते वातावरण निर्मिती करत आहेत. लोकसभेची निवडणूक हरल्यापासून ते नैराश्यग्रस्त झालेले आहेत. राज्यात तीन पक्षांची आघाडी झाल्यामुळे आपल्याला ‘शिरूर’मधून पुन्हा तिकीट मिळणार नाही, हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर जायचे निमित्त शोधत आहेत,’’ असे मोहिते म्हणाले.

भगवान पोखरकर यांच्या राजीनामा नाट्यामागे आम्ही नसून त्यांच्याच पक्षातले नाराज सदस्य आहेत. माझ्या पक्षाच्या सदस्यांना धमक्या येऊ लागल्याने संरक्षणासाठी मी त्यांना माझ्या भावाच्या रिसॉर्टवर आणून ठेवले होते, एवढाच यातील माझा रोल आहे.

- दिलीप मोहिते, आमदार

loading image