अमाप उत्साहात शहरात शिवजयंती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

कोरोनाची खबरदारी
चिंचवडगावातील श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या मिरवणुकीत खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले. शिवप्रेमींकडून आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भातील सूचना देण्यात आल्याचे दत्ता चिंचवडे यांनी सांगितले. शिवभक्तही या वेळेस तोंडाला रुमाल, मास्क बांधून सहभागी झालेले दिसले. तसेच, इतर ठिकाणी कोरोनाच्या बचावासंदर्भातील पोस्टर, फलक घेऊन मिरवणुका काढण्यात आल्या.

पिंपरी - शिवजयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड परिसर ‘जय भवानी जय शिवाजी’ जयघोषाने दुमदुमला. शिवगर्जनेने सारा आसमंत शिवमय झाला होता. शहरात पिंपरीगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, टाळगाव, चिखली, देहूगाव, कासारवाडी, खराळवाडी, थेरगाव, रावेत, किवळे, वाल्हेकरवाडी, आळंदी देवाची, निगडी, आकुर्डी, शाहूनगर या ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ठिकठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत नागरिकांनी शिवज्योतीस नमन केले. शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य मूर्तीसमवेत पालखी मिरवणुका तसेच शोभा यात्राही काढण्यात आल्या. यात पारंपरिक वेशभूषेतील फेटे बांधलेल्या महिला, अश्‍वारूढ मावळे, हत्ती, बैलगाड्या, वारकरी भजनी मंडळी, पारंपरिक वेशातील शिवशाही ढोल पथकांनी, पारंपरिक वाद्य यांनी शिवजन्म सोहळ्यात रंग भरला. शिवरायांच्या वेशभूषेतील बालशिवराय, मावळे, शिवचरित्र रथ, राममंदिर रथ, वैकुंठगमन देखावे आकर्षणाचे मुख्य केंद्र बनलेले होते. पारंपरिक शस्त्रपूजन, मर्दानी खेळ, तलवारबाजी पाहण्यास भाविकांनी गर्दी केली. या वेळेस लहान मुले, महिला, तरुण, ज्येष्ठांनी भगवे ध्वज हातात घेऊन या शिवजयंती सोहळ्यास मोठ्या संख्येने हजेरी लावली. परिसर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणेने दुमदुमून गेलेला या वेळेस पाहायला मिळाला. 

विषाणू घालवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गोवऱ्या-तुळशीचा धुपारा

सरदारांच्या वंशजांचा सहभाग 
श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी स्वराज्याच्या मालुसरे, जेधे, इंदलकर, बांदल, कोंडे, करंजावणे तसेच मारणे, जाधवराव, बलकवडे, गाडे, चापेकर बंधू या सरदारांच्या वंशजांनीही उपस्थिती लावली. 

‘एक गाव एक शिवजयंती’ला यश
चिंचवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवानिमित्त शिवतेजनगर, संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर आदी परिसरातील सर्वच शिवप्रेमींनी सहभाग घेतला. या वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवरायांचा रथ, वारकरी भजनी मंडळ, ऐतिहासिक रथ, कमानी, विद्युतरोषणाई, मिरवणूक मार्गावर व सर्व चौकात भगवे ध्वज लावलेले होते. 

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; आता...

शिवजयंती उत्साहात साजरी
येथील जिजामाता उद्यानात नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळेस शिवजन्म गीतगायनाचा कार्यक्रम घेण्यात आला, तसेच शिवजयंतीनिमित्त पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivjayanti Celebration in pimpri chinchwad