शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतंय 'स्क्रीन अॅडिक्शन'; मुलांमधील आक्रमकता, चिडचिडपणात वाढ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

- मोबाईल, टीव्ही, संगणक यावरील 'स्क्रीन टाइम' वाढला
- मुलांमधील आक्रमकता, चिडचिडपणात होतीय वाढ

पुणे : इयत्ता दहावीचा अभ्यास ऑनलाइनद्वारे करता-करता चिन्मयला (नाव बदललेले आहे) सतत मोबाईल हातात घेण्याची सवय लागली. सुरुवातीला नियमित अभ्यास करणाऱ्या चिन्मयची ऑनलाइन वर्गाला दांडी वाढली आणि ऑनलाइन गेम्स, चॅटींग, व्हिडीओ पाहण्यात तो हजर राहु लागला. एकेदिवशी तो ऑनलाइन गेम खेळत असताना काही कारणासाठी आईने हातातील घेतला. तेवढेच निमित्त ठरले आणि त्याने मोठ-मोठ्याने आदळआपट सुरू केली. त्याच्यात वाढलेली आक्रमकता पाहून घरातील मंडळी घाबरली आणि त्यांनी समुपदेशन घेण्याचा ठरविले.

Positive Story: बचत गटांतील महिलांनी खरेदी केल्या ४३ बस; संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतली दखल​

चिन्मयच्या आई-वडिलांनी काही दिवसांनी समुपदेशकास गाठले आणि त्याच्या वर्तनुकीत झालेल्या बदलांबद्दल समुपदेशकास सांगत उपाय विचारू लागले. त्यातून चिन्मय 'स्क्रीन'च्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आले. चिन्मयप्रमाणेच सध्या अनेक शालेय विद्यार्थी 'स्क्रीन'च्या आहारी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

'माझा मुलगा मोबाईलशिवाय राहत नाही', 'माझी मुलगी टीव्ही समोरून हालत नाही', 'मोबाईल काढून घेतला की मुलगा आदळआपट करतो', असे तुमच्याही घरातील निरीक्षण असेल, तर त्याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. घरातील शालेय विद्यार्थी 'स्क्रीन'च्या व्यसनाच्या आहारी तर जात नाहीत ना, हे याकडे आता काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षापर्यंत 'स्क्रीन'चे व्यसन असलेल्या मुलांचे प्रमाण १० ते २० टक्के होते. मात्र लॉकडाउनमध्ये हे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांपर्यत वाढल्याचे निरीक्षण आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रांचे प्रमुख डॉ. अजय दुधाणे यांनी नोंदविले. 

'इथं रोजचा खर्च भागत नाही, दिवाळी काय साजरी करणार?'​

'स्क्रीन'चे व्यसन लागल्याची लक्षणे :
- दिवसातील बहुतांश वेळ 'स्क्रीन'समोर घालविणे आणि त्याशिवाय चैन न पडणे
- 'स्क्रीन' हातात नसल्यास चिडचिड होणे
- अन्य कोणत्याही उपक्रमात, खेळात रस नसणे
- वर्तनात बदल होणे, आक्रमकता वाढणे
- मुलांना एकटे राहणे आवडू लागणे, संवाद दुरावणे

'स्क्रीन'च्या व्यसन लागू नये म्हणून उपाय :
- घरातील मुले मोबाईल, टीव्ही, संगणक यावर किती वेळ असतात, याकडे हवे लक्ष
- तसेच 'स्क्रीन'वर काय पाहता, हे पहावे
- मुलांशी सातत्याने संवाद साधावा
- ऑनलाइन शिक्षणामुळे 'स्क्रीन टाइम' ठरवून द्यावा आणि अन्य वेळी वेगवेगळे उपक्रम आणि खेळात मुलांना व्यस्त ठेवावे.
- मुलांसमवेत 'क्वालिटी टाइम' घालवावा.
- मुले स्क्रीनवर काय पाहत किंवा काय खेळत आहेत, याबाबत पालकांनी जागरूक असायला हवे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking information about screen time of many school children has increased