esakal | पुण्यात मृत कोरोना रुग्णाचे पाय धुवून पिण्याचा धक्कादायक प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

पुण्यात मृताचे पाय धुवून पिण्याचा धक्कादायक प्रकार

sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

लोणी काळभोर (पुणे) : कोरोनाबाधित ज्येष्ठ रुग्णाच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी जमलेल्या ज्येष्ठाच्या शंभरहून अधिक नातेवाईकांनी मृत व्यक्तीचे पाय धुवून पाणी प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार पुर्व हवेलीमधील एका बड्या ग्रामपंचायत हद्दीत नुकताच उघडकीस आल्याची घटना घडली होती. एकीकडे कोरोनाबाधित मृत व्यक्तीकडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मृत व्यक्तीचे शरीर नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नाही तर दुसरीकडे मात्र कोरोनाबाधित मृत व्यक्तीचे पाय धुवून पाणी पिण्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, मृत व्यक्ती ही कोरोना बाधित नव्हती, गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांचे निधन झाले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी आता दिली आहे.

सरकारने अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकं सहभागी होऊ शकतील असे जाहीर केले असतानाही लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्तीसह पुर्व हवेलीत बहुतांश ग्रामपंचायत हद्दीत अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी शेकडो लोक हजेरी लावून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. दरम्यान पाय धुवून पाणी पिण्याच्या प्रकऱणातील ज्येष्ठाच्या अंत्यविधीसाठीही शेकडो लोक सहभागी झाले.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

पुणे-सोलापूर महामार्गालगत पुर्व हवेलीमधील एका बड्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सत्तर वर्षीय बसप्पा (नाव बदलले आहे) या व्यक्तीचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे शरीर नातेवाईकांच्या ताब्यात न देता काटेकोर नियमांचे पालन करुनच संबधित व्यक्तीवर अंत्यविधी केला जातो. मात्र बसप्पाच्या नातेवाईकांनी विनंती केल्याने रुग्णालय प्रशासनाने बसप्पाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृतदेह ताब्यात मिळताच नातेवाईकांनी शेवटची आंघोळ घालण्याच्या नावाखाली बसप्पाचा मृतदेह ते राहत असलेल्या एका दाटीवाटीच्या वस्तीत नेला व त्या ठिकाणी बसप्पाच्या दहाहून अधिक महिला नातेवाईकांनी बसप्पाला आंघोळ घातली.

हे प्रकरण आंघोळीपर्यंतच थांबणे अपेक्षित होते. मात्र बसप्पाच्या जवळच्या शंभरहून अधिक नातेवाईकांनी बसप्पाचे पाय धुतलेले पाणी पिण्यास सुरुवात केली. ही बाब एका स्थानिक कार्यकर्त्याला खटकल्याने त्याने कोरोनाचा संसर्ग वाढेल यासाठी बसप्पाचे पाय धुतलेले पाणी पिऊ नये व बसप्पाला अंत्यविधीसाठी त्वरीत हलविण्याची विनंती बसप्पाच्या नातेवाईकांच्याकडे केली होती. मात्र बसप्पाच्या नातेवाईकांनी संबधित कार्यकर्त्याला गप्प राहण्यास सांगितले व शंभरहून अधिक नातेवाईकांनी बसप्पाचे पाय धुतलेले पाणी प्राशन केले होते. संबधित कार्यकर्त्याने वरील प्रकार व्हॉटस्अप ग्रुपवर टाकल्यानंतर उघडकीस आला होता. या प्रकरणाचा सखोल तपास करुन, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरीकांनी केली होती.

हेही वाचा: परप्रांतीय परागंदा ः पुणे-मुंबईकरांनी पुन्हा धरली गावची वाट

राज्य सरकारने अंत्यविधीसाठी व दशक्रियाविधी जास्तीत जास्त वीस लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे. राज्य सरकारचा वरील आदेश संपुर्ण राज्यात पाळला जात असला तरी, या आदेशाला पुर्व हवेली अपवाद असल्याचे चित्र दिसुन येत आहे. लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पुर्व हवेलीत कोरोनाचा हैदोश सुरु असला तरी, पुर्व हवेलीमधील प्रत्येक गावात अंत्यविधीसाठी व दशक्रियाविधी शेकडो लोक जमा होत असल्याचे दिसून येत आहे. वरील दोन्ही कार्यकर्मात सोशल डिस्टन्स अथवा मास्क सक्ती कोणीही पाळत नसल्याचेही दिसून येत आहे. उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या तीनही ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीत झालेल्या अंत्यविधी व दशक्रिया विधींची मागील दहा दिवसांतील माहिती घेतल्यास राज्य सरकारने पुर्व हवेलीत वरील नियमात सुट दिली की काय असा प्रश्न पडू शकतो.