पुणे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

medicine

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Medicine : पुणे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा

पुणे - जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी गेलेल्या रुग्णांना आवश्‍यक औषधे वेळेवर मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र सर्व आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेशा साठा उपलब्ध असून, केवळ वातावरण बदलांमुळे अचानक उदभवलेल्या काही साथींच्या आजारांसाठीच्या औषधांचा तुटवडा तोही तात्पुरत्या स्वरूपात जाणवत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्थानिक रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जखम होणे, उलटी, जुलाब, खोकला रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (शुगर) यासारख्या आजारांवरील उपचारांचा समावेश असतो. सध्या जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. या वातावरण बदलामुळे खोकला, सर्दी आणि तापाची रुग्ण संख्या वाढली आहे. त्यामुळे अचानक रुग्ण संख्या वाढल्याने या आजारांवरील औषधांचा काही अंशी तात्पुरता तुटवडा निर्माण होत आहे. परंतु त्यावर लागलीच पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचे प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात १०२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५३९ उपकेंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांवर सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठीच्या औषधांचा पुरवठा नियमितपणे केला जात आहे. याशिवाय अचानक मागणी वाढलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यास, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला जवळच्या केंद्रातून औषधांचा तात्पुरता पुरवठा करण्यात येत आहे.

कोरोनामुळे शुगर, बीपी रुग्णांच्या संख्येत वाढ

कोरोना संसर्गामुळे मागील तीन वर्षात जिल्ह्यातील रक्तदाब व मधुमेहाच्या (शुगर) रुग्णांच्या संख्येत ५ लाख ९४ हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या सर्व रुग्णांना प्रत्येकी एका महिन्याच्या गोळ्या एकावेळी आधीच पुरविल्या जात आहेत. परंतु महिनाभराच्या गोळ्यांच्या वाटप करूनही काही रुग्णांच्या गोळ्या हरविल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे असे रुग्ण पुन्हा पुन्हा म्हणजेच एकाच महिन्यात दुसऱ्यांदा गोळ्यांची मागणी करत असतात. यामुळे या आजारांवरील गोळ्या दुसऱ्यांदा वाटपासाठी उपलब्ध नसतात. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळ्या-औषधांचा तुटवडा असल्याची नाहक चर्चा ग्रामस्थ करत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

रुग्ण कल्याण समित्यांना अधिकार

दरम्यान, कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यास, अशा आवश्‍यक औषधांची खरेदी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर रुग्ण कल्याण समित्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या समित्यांमार्फत प्रत्येकी पन्नास ते साठ हजार रुपयांच्या किंमतीपर्यंतची औषधे स्थानिक पातळीवर खरेदी करता येतात. तशा सूचना रुग्ण कल्याण समित्यांना दिल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध आहेत. परंतु सर्दी, खोकला यासारख्या आजारांवरील औषधांची मागणी अचानक वाढल्याने काही प्रमाणात कधीकधी या आजारांवरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. परंतु हा तुटवडा लगेचच भरून काढला जात आहे.

- ऋषीकेश तांबे, ग्रामस्थ, ओतूर, ता.जुन्नर.

टॅग्स :punemedicinehealth