गायक महेश काळे यांचे फॅन असाल तर, ही बातमी नक्की वाचा

kale.jpg
kale.jpg

पुणे : सध्या कोविड-१९ विषाणूने जगभरातील जनजीवन विस्कळीत झाले असताना कलेची सेवा करणारे कलाकार देखील या काळात अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. हेच लक्षात घेत या कलाकारांना मदत करावी या बरोबरच त्यांच्या मैफली पुन्हा सुरु होऊन त्यांच्यामध्ये देखील उत्साह यावा, या उद्देशाने राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे यांनी सॅनफ्रान्सिस्को स्थित आपल्या इंडियन क्लासिकल म्युझिक अॅण्ड आर्ट्स अर्थात आयसीएमए या संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.

या अंतर्गत महेश काळे यांच्या संकल्पनेतून ‘आर्टिस्ट अॅप्रिसिएशन अॅवॉर्ड २०२०’ ही पुरस्कार मालिका आणि आयसोलेटेड यट टुगेदर #IsolatedYetTogether  ही छोटी मैफलीची मालिका सुरु करण्यात आली आहे. संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या उपस्थितीत नुकतीच फेसबुक व यु ट्यूब या समाजमाध्यमांवर लाईव्ह पद्धतीने याचे उद्घाटन करण्यात आले. स्वत: महेश काळे, आयसीएमएचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रसिक यावेळी आपआपल्या ठिकाणाहून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना महेश काळे म्हणाले, “आपण आपल्या क्षेत्रात कितीही लहान असू अथवा मोठे असू सामाजिक बांधीलकी ही जपलीच पाहिजे, असे माझे गुरु नेहमी म्हणायचे. हीच गोष्ट गेले अनेक माहिने मनात होती. यामधूनच ‘आर्टिस्ट अॅप्रिसिएशन अॅवॉर्ड २०२०’ आणि आयसोलेटेड यट टुगेदर #IsolatedYetTogether या संकल्पना पुढे आल्या आणि आयसीएमए आणि माझ्या हितचिंतकांच्या मदतीने त्याला लागलीच मूर्त स्वरूप देखील आले. कोणत्याही कलाकाराची उपजीविका ही तो करीत असलेल्या कार्यक्रमांवर अवलंबून असते. मात्र कोविड १९ च्या काळात सध्या सर्वच सार्वजनिक कार्यक्रम बंद असून, गेल्या दीड महिन्यांपासून कलाकार देखील अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. प्रेक्षकांपासून दूर असण्याबरोबरच सांगीतिक कार्यक्रम पुन्हा कधी सुरु होतील याची शाश्वती नसल्याने कलाकारांमध्ये अस्वस्थता आहे. याच बाबी लक्षात घेत कलाकारांना छोटीशी मदत करण्याबरोबरच त्यांना पुरस्कार देत, त्यांच्या मैफलींचे आयोजन करीत त्यांना विश्वास दयावा या उद्देशाने आम्ही या उपक्रमांना सुरुवात केली आहे.’’

याद्वारे पुरस्कारासाठी देशभरातील तब्बल २४ कलाकार आम्ही निवडले असून त्यांना आयसीएमएच्या वतीने प्रत्येकी रुपये २५ हजारे पुरस्कार स्वरूपात देण्यात येतील. याबरोबरच त्यांच्या छोट्याश्या लाईव्ह मैफिलीचे आयोजन देखील संस्थेच्या वतीने करण्यात येईल. पुढील तीन महिने प्रत्येक शनिवारी भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. भारतीय प्रेक्षकांबरोबरच अमेरिका, युरोप येथील प्रेक्षक घरबसल्या या लाईव्ह मैफलीत विनामूल्य सहभागी होऊ शकणार असल्याचेही काळे यांनी या वेळी सांगितले. देशभरातील हे २४ कलाकार निवडताना शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकार असलेले गुंदेचा बंधू, बॉम्बे जयश्री, शौनक अभिषेकी, शुभंकर बॅनर्जी, सेल्वा गणेश, कौशिकी चक्रवर्ती यांची आम्हाला खूप मदत झाल्याचेही काळे यांनी यांनी नमूद केले.

या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पं. जसराज म्हणाले, “शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी सर्वांनीच एकत्र येत खुल्या मनाने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. महेश काळे यासाठी आयसीएमएच्या माध्यमातून करीत असलेले काम पाहून मला देखील आनंद झाला. त्यांच्या या कार्यासाठी माझे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत.”  

नुकत्याच झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पहिल्या ‘आर्टिस्ट अॅप्रिसिएशन अॅवॉर्ड २०२०’च्या पुरस्कार्थी गायिका रिंदाना रहस्या यांनी आपली गायनकला सादर केली. रिंदाना या दिल्ली स्थित असून शास्त्रीय गायिका उमा गर्ग यांच्या शिष्या आहेत. त्यांच्या मैफलीने उद्घाटनाच्या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या ‘सहेला रे’ या भूपाली रागातील बंदिशीने त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. यानंतर दृत एकतालात रागेश्री रागातील ‘देखो श्याम’ ही बंदिश देखील त्यांनी सादर केली. त्यांच्या या मैफलीला प्रेक्षकांनी ऑनलाईन कमेंट्स करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुढील शनिवारी गायक प्रमोद गोखले व सौरभ काडगावकर यांची मैफल रंगणार असल्याचेही आयोजकांनी जाहीर केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

इंडियन क्लासिकल म्युझिक अॅण्ड आर्ट्स अर्थात आयसीएमए ही स्वत: महेश काळे यांनी स्थापन केलेली संस्था असून याद्वारे शास्त्रीय संगीताचे संवर्धन व प्रसार करण्याचे कार्य केले जाते हे विशेष. संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणारे ‘आर्टिस्ट अॅप्रिसिएशन अॅवॉर्ड २०२०’ व आयसोलेटेड यट टुगेदर #IsolatedYetTogether हे उपक्रम संस्थेच्या फेसबुक पेजवर व यु ट्यूब चॅनलवर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत, तरी सर्वांनी यामध्ये सहभागी होत कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महेश काळे यांनी या वेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com