चार दिवसांत एसटीच्या पुणे विभागाला सहा कोटींचा फटका | ST Loss | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus
चार दिवसांत एसटीच्या पुणे विभागाला सहा कोटींचा फटका

चार दिवसांत एसटीच्या पुणे विभागाला सहा कोटींचा फटका

पुणे - एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे सरकारी कर्मचारी समजण्यात यावे. तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात सलग चौथ्या दिवशीही एसटी कामगार सहभागी झाले होते. त्यामुळे या चार दिवसांत एसटीच्या पुणे विभागाला सुमारे ६ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणनवरे यांनी दिली.

शहरातील स्वारगेट, पुणे स्टेशन, वाकडेवाडी (शिवाजीनगर) आदी आगारांसह जिल्ह्यातील १३ डेपोंतील कर्मचारी सोमवारपासून (ता. ८) संपात सहभागी झाले आहेत. यामुळे एसटीच्या पुणे विभागाला दररोज सुमारे दीड कोटीचा आर्थिक फटका बसत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोवर संप मागे घेतला जाणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे. त्यामुळे एसटीला अधिक आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बुधवारी (ता.१०) शहरातील एसटी स्थानकावरून २०० खासगी बसगाड्या सोडल्या होत्या. त्यापैकी कोल्हापूर मार्गावर गेलेल्या गाडीवर इतर आठ ते दहा ठिकाणी खासगी बसेसवर दगडफेक करण्यात आली तसेच ड्रायव्हर चालकांना मारण्यात आले. यात चालक जखमी झाले आहेत. तसेच बाहेरून अनेक गाड्या त्या त्या मार्गावरुन विनावाहक आल्या. यामुळे आर्थिक नुकसान झाले.

हेही वाचा: PDCC च्या वतीने सहकारी सोसायटीच्या २६२ सचिवांना प्रशिक्षण

खासगी बस संघटनेच्या भूमिकेमुळे उडाला गोंधळ

खासगी बस वाहतुकीला संरक्षण दिले नाही. यामुळे स्वारगेट स्थानकावर बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय खासगी वाहतूक संघटनेने घेतला होता. यामुळे स्वारगेट स्थानकावरून बस बाहेर काढल्या होत्या. काही काळासाठी शुकशुकाट दिसून आला. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मात्र, एसटीचे विभागीय प्रमुख, आरटीओचे अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन यावर तोडगा काढला. काही काळासाठी स्थानकावरील थांबलेली वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. दिवसभरात ही एक गोंधळाची परिस्थिती सोडता वाहतूक सुरळीत पार पडली, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले.

गोंधळामुळे दिवसभरात धावल्या एवढ्या बस

  • २० ते २५ - सकाळचे सत्र

  • ३० ते ४० - दुपारनंतरचे सत्र

  • ५०० - राज्य-परराज्यांत गेलेल्या बस

परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत मुंबईत बैठक पार पडली. खासगी बसला व चालकांना सुरक्षा देण्याची हमी दिली. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात आरटीओ नोडल ऑफिसर नेमण्यात येणार आहे. राज्यातील सर्व खासगी बसेस दुपारनंतर सुरू करण्यात आल्या असून, सेवा सुरू राहणार आहे.

- बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य प्रवासी व मालवाहतूक संघटना

आकडे बोलतात

  • १,५०,००,००० - दिवसाचे नुकसान

  • ४,००० - दिवसाला रद्द झालेल्या फेऱ्या

  • ४३०० - कर्मचारी संख्या

  • २६ - बुधवारी तीन डेपोंतील निलंबित कर्मचारी

  • १४८ - गुरुवारी १३ डेपोंतील निलंबित कर्मचारी

loading image
go to top