esakal | ‘बीआरटी’ची शक्कल बायकोने काढली अक्कल!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘बीआरटी’ची शक्कल बायकोने काढली अक्कल!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘तुम्ही मला नक्की न्यायला येणार आहात ना? नाहीतर काहीतरी कारण सांगून मला फसवताल आणि माझ्या माहेरच्यापुढे माझी लाज घालवताल. यापूर्वी दोनदा असा प्रकार घडला आहे म्हणून विचारते.’’ माधुरीने दीपकला म्हटले. ‘अगं काळजी करु नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मी बरोबर दुपारी एकला सासरवाडीत पोचतो. तुझ्या गळ्याची शपथ.’ दीपकने आश्वासन दिले. (SL Khutwad Writes 14th July 2021)

माधुरी तीन दिवसांपूर्वी माहेरी विश्रांतवाडीला गेली होती. तिच्या आई-वडिलांनी जावईबापूंना घरी बोलव. आपण त्यांचा चांगला पाहुणचार करू, असा आग्रह धरला होता. मात्र, वेळ मिळत नसल्याने दीपक जायचे टाळत होता. पण माधुरीने फारच आग्रह केल्याने तो तयार झाला होता. जावईबापू येणार म्हणून सासऱ्यांनी भारी ड्रेस आणला तर सासूबाईंनी पंचपक्वांनांचा बेत आखला होता. कात्रजवरुन आपण विश्रांतवाडीला पाऊणतासात पोचू, असा अंदाज त्याने बांधला व सव्वाबाराच्या सुमारास तो कार घेऊन घरातून बाहेर पडला. मात्र, पद्मावतीजवळ पोचताच वाहतूक कोंडीत तो अडकला. आपल्याला थोडाजरी उशीर झाला तरी माधुरी आपल्या नावाने ठणाणा करणार, याची भीती त्याला वाटू लागली. तेवढ्यात त्याला बीआरटी मार्गाचा पर्याय दिसला. त्याने लगेच त्याची मोटार बीआरटीत घुसवली. आता स्वारगेटपर्यंत काही काळजी नव्हती. आपल्या अक्कलहुशारीवर दीपक खूष होऊन शीळ वाजवू लागला. वाहतूक कोंडीत अडकलेल्या व्यक्तींकडे तुच्छतेने पाहत गाणी म्हणत तो गाडी चालवू लागला. त्याची कार एका पीएमपी बसच्या मागे होती. बसचा वेगही खूप असल्याने त्याची काही अडचण नव्हती.

हेही वाचा: पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हाती

दीपकचे अनुकरण पाच-सहा वाहनचालकांनी केले. ते त्याच्या मागोमाग येऊ लागले. डीमार्टपर्यंतचे अंतर जलदगतीने कापल्याने आपण ठरलेल्या वेळेच्या आत पोचू, असा त्याला विश्वास आला. मात्र, भापकर पेट्रोलपंपाजवळ आल्यानंतर त्याच्या पुढची बस बंद पडल्याचे दिसली. पीएमपी बस पुढे सरकत नसल्याचे पाहून त्याचे धाबे दणाणले. तो कारमधून उतरला व बसचालकाकडे गेला. ‘काय झालंय?’ त्याने विचारले. ‘दिसत नाही का बस बंद पडलीय ती.’’ बसचालक दीपकवर चांगलाच खेकसला. ‘किती वेळ लागेल?’ तरीही दीपकने विचारले. ‘मी काय ज्योतिषी आहे का?’ बसचालकाच्या या प्रश्नावर तो निरुत्तर झाला. कार मागेही घेता येईना आणि पुढेही जाता येईना, अशी त्याची अवस्था झाली. तासभर दीपक बीआरटी मार्गावर थांबून राहिला. इकडे माधुरी दर दहा मिनिटांनी कोठे आलाय, असे विचारून हैराण करीत होती. त्यावर ‘आलोच...आलोच...’ असे उत्तर देऊन दीपक वेळ मारून नेऊ लागला. अखेर दुपारी अडीचच्या सुमारास बसदुरुस्त करणारे कर्मचारी आले व त्यांनी अर्ध्या तासात ती दुरुस्त केली. दरम्यानच्या काळात वाहतूक पोलिसांनीही दीपकला रिंगणात घेतले. ‘‘बीआरटीत बस घुसवल्याबद्दल एक हजारांचा दंड त्याच्याकडून वसूल केला. दुपारी तीनला माधुरीचा फोन आला. ‘तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात. तुम्ही आता अजिबात येऊ नका. माझी पार लाज घालवली.’ असे म्हणत ती रडू लागली आणि दीपक मात्र ‘सॉरी...सॉरी’ एवढंच म्हणत होता.

loading image