esakal | भांडी, कचरा अन् दळण संसाराला वेगळंच वळण...
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

भांडी, कचरा अन् दळण संसाराला वेगळंच वळण...

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

सलग दोन तास समीर उत्साहात भांडी घासत असल्याचे पाहून त्याच्या आईला आश्चर्य वाटले. खरकटी भांडी त्याने घासलीच शिवाय फळीवरील, किचन ट्रॉलीतील भांडीही त्याने घासून ठेवली. ‘‘आई, मी दळण दळून आणतो,’’ असे म्हणून त्याने अर्धा किलो ज्वारी पिशवीत भरली. ‘‘रोज ताजं दळून खाल्लं तर ते शरीराला चांगलं असतं. त्यामुळे मी दररोज ताजं दळून आणणार,’’ असं म्हणून तो बाहेर पडला.

तासन् तास बेडवर लोळणारा, सतत व्हॉट्सॅअप, फेसबुकवर पडीक राहणारा, इकडची काडी तिकडे न करणारा, एक नंबरचा आळशी असलेल्या समीरमध्ये अचानक एवढा बदल झाल्याने त्याची आई चक्रावून गेली. कोपऱ्यावरील गिरणीत समीर पोचल्यानंतर दोनच मिनिटांत मानसी तिथे पोचली. तिनेही अर्धा किलो गहू दळण्यासाठी आणले होते. मग काय दोघांचंही गुलूगुलू बोलणं सुरू झालं. जेवणानंतर केर कचरा काढू व सोसायटीतील कचरा कुंडीत टाकायला खाली येऊ व तिथे गप्पा मारत बसू , असे ठरवून ते दोघे दीड तासाने दळण घेऊन घरी पोचले. ‘‘गिरणीत खूपच गर्दी होती,’’ आईनं उशीराचं कारण न विचारताच समीरनं ते सांगून टाकलं. गेल्या आठवड्यापासून मानसीचं कुटुंब समीरच्या घरासमोर राहायला आलं आहे. समीरने एकदा मानसीला भांडी घासताना किचनमधून पाहिले आणि ‘लव्ह अॅट फस्ट साईट’ अशी त्याची अवस्था झाली. मानसीचीही यापेक्षा काही वेगळी अवस्था नव्हती. दोघेही तासभर एकमेकांकडे पाहतच राहिले. दुसऱ्या दिवसांपासून मानसी भांडी घासायला आल्यानंतर समीरनेही भांडी घासायला सुरुवात केली. मग हा त्यांचा रोजचा रिवाजच झाला.

हेही वाचा: घरात घुसून टोळक्‍याकडून कोंढवे धावडेत महिलेस जबर मारहाण

सकाळी व संध्याकाळी दोघेही बाल्कनी झाडू लागले. हे काम करत असताना दोघांचेही लक्ष एकमेकांकडेच असे. गालातल्या गालात हसत दोघेही काम करत. पाच मिनिटांच्या या कामाला तास-दोन तास लागू लागले. मग कचरा टाकण्याच्या नावाखाली दोघेही सोसायटीच्या कचऱ्याच्या डब्याजवळ प्रेमाच्या गप्पा मारू लागले. त्या अगदी तास-दोन तास रंगू लागल्या.

दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. समीर व मानसीला एकमेकांना पाहण्याची इच्छा झाली, की दोघेही भांडी घासायला घेत. यासाठी ते वेळ-काळाचाही विचार करेनासे झाले. रात्री अकरा, बारा इतकंच काय पहाटे तीन-चारलाही त्यांचा भांडी घासायचा कार्यक्रम रंगू लागला. खिडकीतून प्रेमाचा कटाक्ष टाकत, तर कधी खाणाखुणा करीत दोघांचे प्रेम अधिक बहरू लागले. केवळ नजरेने पाहण्याचा कंटाळा आला की पावशेर किंवा अर्धाकिलो धान्य घेऊन दळायला जात. त्यालाही वेळ-काळाचंही बंधन उरलं नाही. मात्र, लवकरच ही गोष्ट दोघांच्याही घरच्यांच्या लक्षात आली. दोन्ही घरातून त्यांच्या प्रेमाला मोठा विरोध झाला. घरातील सगळीच कामे त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. दोघेही विरहात होरपळू लागले आणि मग समीर आणि मानसी यांनी पळून जाऊन लग्न केले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी भांडी कोणी घासायची, घरातील केरकचरा कोणी काढायचा आणि दळण कोणी दळून आणायचे यावरून दोघांच्यात कडाक्याचे भांडण झाले. अन् तास-दोन तास झाले तरी त्यांच्यातील भांडण काही मिटेना.

loading image