वहिनींची छत्री

हो, मिठाचा पुडा आणि चहापावडर आणून देता का?’ प्राचीने दिनेशला विचारले. ‘अगं, एवढा मुसळधार पाऊस पडतोय आणि तू मला घराबाहेर पाठवतेस?
Panchnama
PanchnamaSakal

हो, मिठाचा पुडा आणि चहापावडर आणून देता का?’ प्राचीने दिनेशला विचारले. ‘अगं, एवढा मुसळधार पाऊस पडतोय आणि तू मला घराबाहेर पाठवतेस? मला जमणार नाही,’ दिनेशने ठामपणे म्हटले. ‘अहो, मी गेले असते; पण माझ्या छत्रीच्या तीन काड्या मोडल्यात. त्यात बटण पण व्यवस्थित चालत नाही. तुम्हाला मी किती वेळा सांगितले असेल, छत्री नवीन घ्या म्हणून. आठ वर्षे झाली मी एकच छत्री वापरतेय. माझ्या मेलीची कसली हौस नाही की मौज नाही.’ प्राचीने डोळ्यांत पाणी आणत म्हटले. ‘बरं बरं ठीक आहे. वेळ मिळाला की आणेल. नाहीतरी आता किती दिवस पावसाळ्याचे राहिलेत?आता पुढच्या वर्षीच नवीन छत्री घेऊ,’ असे म्हणत दिनेशने बाहेर जाण्याचा आणि छत्रीचा विषय थांबवला. थोड्या वेळाने दिनेश तयार होऊन ऑफिससाठी घराबाहेर पडला. गाडी बाहेर काढताना त्याचे लक्ष छत्री घेतलेल्या सुचेतावहिनींकडे गेले. पार्किंगमधून त्या सारखं बाहेर बघत होत्या. ‘काय वहिनी, कोठे बाहेर चाललाय का?’ दिनेशने विचारले. ‘अहो घरी पाहुणे आलेत आणि नेमकं दूध संपलंय म्हणून कोपऱ्यावरच्या दुकानातून ते आणण्यासाठी मी चाललेय.

पण पाऊस एवढा जोरात पडतोय की छत्री असूनही मी भिजेल म्हणून थांबलेय.’ ‘अहो, हे काम मला सांगायचं ना. मी दोन मिनिटांत दूध आणून देतो.’ असं म्हणून त्यांच्याजवळील छत्री घेऊन दिनेश रस्त्याच्या पलीकडे गेलासुद्धा. मात्र दूध घेऊन परत येत असताना सोसाट्याच्या वाऱ्याने छत्री पार उलटी-पालटी झाली. तिच्या तारा मोडल्या. पाऊस इतका मुसळधार होता की दोनच मिनिटांत दिनेश ओलाचिंब झाला. तरीपण मोहीम फत्ते केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. ‘भावोजी, पूर्ण भिजलात की.’ वहिनींनी म्हटले. आता त्या पदरानं आपलं डोकं पुसतील, असं सुखद चित्र दिनेशच्या डोळ्यांसमोर तरळलं. पण तसं काही झालं नाही. ‘थँक्यू’ म्हणून त्या निघून गेल्या. आता कपडे बदलण्याशिवाय दिनेशपुढे पर्याय नव्हता. तो घरी आल्यानंतर प्राचीला आश्चर्य वाटलं.’ ‘अहो, गाडी असताना भिजला कसे?’ ‘अगं, पार्किंगमध्ये असताना कोणीतरी वरून पाण्याची बादली ओतली.’ दिनेशने ठोकून दिले. ऑफिसला गेल्यानंतर आपल्या हातून सुचेतावहिनींची छत्री मोडली, याची खंत दिनेशला वाटू लागली.

Panchnama
Corona: पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून राहणार बंद

मग ‘हाफ डे’ घेऊन तो छत्री खरेदीसाठी कॅंप भागात गेला. तेथे दोन तास घालवून दीड हजार रुपयांची ब्रँडेड लेडीज छत्री घेतली. आता त्याच्या डोक्यावरचं ओझं उतरलं होतं. कधी एकदा छत्री वहिनींच्या हातात देतोय, असे त्याला झाले होते. घरी जाण्यापूर्वी आधी तो वहिनींच्या घरी गेला व त्यांना छत्री दिली. आधी वहिनी छत्री घेतच नव्हत्या; पण दिनेशने फारच आग्रह केल्याने त्या तयार झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनी दिनेशच्या घरी आल्या. ‘‘अहो भावोजी, तुम्ही दिलेल्या छत्रीचं बटणच खराब झालंय. ती उघडतच नाही.’’ असे म्हणू लागल्या. कोण आलंय हे बघण्यासाठी प्राची हॉलमध्ये आली. त्यावेळी तिला पाहून वहिनी म्हणाल्या, ‘‘अहो ताई, भावोजींनी काल दुपारी पावसात भिजत मला दूध आणून दिलं. नेमकी त्यावेळी माझी छत्री त्यांच्या हातून मोडली म्हणून दीड हजार रुपयांची नवीन छत्री त्यांनी मला दिली. फारच मोठ्या मनाचे आहेत हो. ‘‘वहिनींनी असं म्हटल्यावर प्राचीचे डोळे रागाने लाल झाले. पुढं काय झालं, हे सगळं सांगण्याची खरंच गरज आहे का? गेल्या तीन दिवसांपासून दिनेश बाहेर कोठेही जेवतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com