डोकेदुखीचे नाव मुखी; सुखी जीवही होई दु:खी

आज सकाळपासून रविराजला जाम कंटाळा आला होता. त्यामुळे ‘डोकं दुखतंय म्हणून ऑफिसला येऊ शकणार नाही’, असं त्याने फोन करून सांगितले.
डोकेदुखीचे नाव मुखी; सुखी जीवही होई दु:खी

आज सकाळपासून रविराजला जाम कंटाळा आला होता. त्यामुळे ‘डोकं दुखतंय म्हणून ऑफिसला येऊ शकणार नाही’, असं त्याने फोन करून सांगितले. मग त्याच्या बायकोनं स्वातीनं डोकं दुखतंय तर ‘हे करू नका अन् ते करू नका’, असं पालुपद तासभर लावलं. त्यामुळं खरोखरच त्याचं डोकं दुखू लागलं. शेवटी ‘किचनओटा आणि घर स्वच्छ ठेवा नाहीतर तुम्हालाच आवरायला लावेन’, असा सज्जड इशारा (पक्षी : दम) देऊन ती ऑफिससाठी घराबाहेर पडली. ती गेल्यानंतर रविराजला एकदम हलकं वाटायला लागलं. आता सहा वाजेपर्यंत तो त्याच्या मनाचा राजा होता. थोड्यावेळाने त्याचा मित्र समीरचा ऑफिसमधून फोन आला. ‘डोकेदुखी कशी आहे?’, असं त्यानं विचारलं. ‘अरे आताच ऑफिसला गेली आहे,’ असं त्यानं मोठ्याने हसत सांगितलं. तासभर शिळोप्याच्या गप्पा त्यांनी मारल्या. ‘‘बरं ऑफिसमध्ये खूप काम पडलंय’, असं सांगून समीरने फोन बंद केला. त्यानंतर अंडरवेअर व बनियन या पुरुषांच्या घरगुती राष्ट्रीय पोशाखात घरभर तो आनंदाने बागडू लागला.

तासभर सोशल मिडियावर फिरून आल्यानंतर थोडावेळ टीव्ही लावून तो हॉलमध्ये बसला. तेवढ्यात बेल वाजल्याने तो सावध झाला. शर्ट-पॅंट घालून दार उघडावे काय, असं त्याला वाटलं. पण कोण आलंय, हे पाहण्यासाठी त्याने आयव्होलमधून पाहिलं तर कुरियरबॉय होता. आता दोन-तीन सेकंदासाठी बेडरुम जा आणि कपडे घाला, याचा त्याला कंटाळा आला. त्याने अंडरवेअर व बनियनवरच दरवाजा उघडला. ‘सही लागेल’ असं कुरियरबॉयने सांगितल्याने तो दरवाजा उघडून पॅसेजमध्ये आला. सही करून, त्याने कुरिअर ताब्यात घेतले. मात्र, तेवढ्यात जोराचा वारा आल्याने दरवाजा धाडकन आदळून बंद झाला. ते पाहून रविराजच्या काळजाचे ठोके चुकले. दरवाजाला लॅच की होती व एक चावी आतमध्ये राहिली होती तर दुसरी स्वातीच्या पर्समध्ये असते. कोणाला फोन करावं म्हटलं तर फोनही आतमध्ये राहिला होता. खाली जाऊन सिक्युरिटीला आपली अडचण सांगावी म्हणून तो लपत-छपत खाली गेला. पण तेवढ्यात सोसायटीतील चार-पाच महिला शेजारच्या बाकड्यांवर बसून गप्पा मारत होत्या. त्यांच्यासमोर कसं जायचं म्हणून तो परत आला व पॅसेजमध्ये थांबला.

डोकेदुखीचे नाव मुखी; सुखी जीवही होई दु:खी
शेजाऱ्यांच्या भांडणाला कंटाळून महिलेची आत्महत्या; पाच जणांना अटक

दोन-तीन शेजाऱ्यांची बेल त्याने वाजवली. पण दुपारचे घरी कोणी नसल्याने तिथेही तो रिकाम्या हाताने परत आला. तेवढ्यात शेजारच्या मनिषावहिनी घरी येत असल्याचे त्याला दिसले. त्यांनी आपल्याला या अवतारात बघू नये म्हणून तो जिन्याखाली लपला. थोडावेळ तो तिथेच बसला. दिवसभर त्याचे हेच सुरु होते.

त्यातच पोटात अन्नाचा कण नसल्याने त्याला जोरात भूक लागली होती. मात्र, स्वाती घरी येईपर्यंत त्याला वाट पहावी लागणार होती. कशीबशी त्याने तग धरली. सहा वाजता स्वातीचा आवाज ऐकल्याने त्याच्या जीवात जीव आला. मात्र, तिच्याबरोबर तिच्या तीन-चार मैत्रिणी आल्याने त्याच्या चिंतेत भर पडली. नवरा घरात नाही, हे बघून तिने घर डोक्यावर घेतले आणि इकडे बायकोच्या मैत्रिणी घराबाहेर कधी पडतायत, याची तो वाट पाहू लागला. मात्र अर्ध्या तासाने त्याचा संयम सुटला व अंडरवेअर व बनियनवरच घरात जायचे त्याने ठरवले. डोळे बंद करूनच तो घरात शिरला. मात्र, स्वातीच्या नवऱ्याचं हे विचित्र ध्यान पाहून हाॅलमध्ये बसलेल्या तिच्या मैत्रिणी रुमाल तोंडाला लावून जोरजोरात हसू लागल्या. मग स्वातीने मैत्रिणींदेखतच रविराजची कानउघाडणी केली आणि त्यामुळं खरोखरच त्याचं डोकं दुखायला लागलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com