गॅसच्या बचतीमुळे आम्ही मात्र ‘गॅस’वर

Gas
Gas

आज सकाळी पाहिलं तर बायको सिलिंडरला आडवा-तिडवा लोळवत होती व त्याला जोरात हलवून आपटत होती. आपल्या भांडणाचा राग त्या बिचाऱ्या सिलिंडरवर का काढीत आहेस, असं आम्ही विचारलं. ‘‘अहो, सिलिंडरचा दर साडेआठशे रुपये झाला आहे. त्यामुळे त्यातील गॅस अजिबात वाया घालवून चालणार नाही. आम्ही बायका काटकसरीने असा संसार करतो. म्हणून तुमचं निभावून जातं. नाहीतर तुम्ही कधीच रस्त्यावर आला असता.......’’ बायकोने ही कॅसेट सुरू केल्यानंतर तातडीने आम्ही अंघोळीसाठी पळालो. टूथपेस्ट संपली तरी लाटण्याच्या साह्याने त्यातील उरलेली पेस्ट काढणे, बाटलीतील खोबरेल तेल संपले की शेगडीवर बाटली गरम करून, त्यातून तेल काढणे आदी कामे करताना आम्ही तिला नेहमी पाहतो पण या पद्धतीने सिलिंडरमधून गॅस बाहेर काढताना आम्ही पहिल्यांदा पाहत होतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अहो, सिलिंडरचे भाव वाढल्याने गॅस वाचवण्याशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे दिवसातून दुपारी एकदाच स्वयंपाक केला जाईल. दुपारचे जे शिल्लक असेल, तेच रात्री खावे लागेल. रात्री पुन्हा शेगडी पेटवली जाणार नाही. आठवड्यातून दोन दिवस सिलिंडरला सुटी द्यायची. ‘नो कुकिंग डे’ पाळायचा. त्यादिवशी मोड आलेली कडधान्ये व फळ आहार घ्यायचा.’’ चहा देता- देता बायकोने पुढील नियोजन सांगितले. निर्णयाची अंमलबजावणीही तातडीने करण्यात आली. रात्रीच्या स्वयंपाकाला तिने सुटी दिली. त्याऐवजी ती सासू- सुनांच्या मालिका आवडीने बघू लागली. किती दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला, असे मल्लिनाथी तिने केली.

दुसऱ्या दिवशी ‘नो कुकिंग डे’ होता. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये व फळे जेवणात होती. सोबत टोमॅटो, गाजर आणि काकडीही होती. 
सकाळीही जे खायचे, तेच रात्रीही खायचे. त्यामुळे आमचे जेवण निम्म्यापेक्षा कमी झाले. तसेच आठवड्यातून दोन दिवस कडधान्यांवर काढू लागल्याने तीन आठवड्यांतच आमचे पाच किलो वजन घटले. मात्र, पुढेही असंच चालू राहिलं तर आम्ही फक्त हाडाचा सापळा बनू, अशी भीती आम्हाला वाटू लागली.     
‘परवा दिवशी गॅस जास्त खर्च झाला आहे. त्यामुळे आज शेगडी नको पेटवायला. त्याऐवजी आपण हॉटेलमधून जेवण मागवू.’’ तिने असे सांगितल्यावर आम्ही निमूटपणे अंमलबजावणी केली. मात्र, असे सातत्याने घडू लागले. पण आम्ही तक्रार केली नाही. मात्र, या प्रकारामुळे बायको स्वयंपाक करायची विसरेल की काय अशी शंका आम्हाला येऊ लागली.

वरील उपाययोजनांमुळे गॅसची टाकी तब्बल अडीच महिने पुरली. त्यामुळे बायको एकदम खूष झाली. ‘‘अहो, पूर्वी सिलिंडरची एक टाकी बळंबळं महिनाभर जायची पण काटकसर करायला सुरवात केल्याने तीच टाकी तब्बल अडीच महिने गेली. म्हणजे किमान हजार- बाराशे रुपये वाचले की नाही.’’ 
‘व्वा ! व्वा ! किती छान’’ आम्ही कसनुसं हसत म्हटलं. पण मनातल्या मनात हॉटेलचा व इतर खर्च साडेचार हजार रुपये झाला होता, याची तिला आठवण करू दिली नाही. ‘‘यावेळी गॅस सिलिंडर अडीच महिना गेला आता पुढील सिलिंडर सहा महिने जाईल, असे नियोजन करू. आता शेजारच्या मंदिरात दररोज महाप्रासादालाच जाऊ. महागाईवर मात करण्यासाठी तोच एकमेव पर्याय दिसतोय.’’ खाली मान घालून आम्ही एवढेच म्हणालो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com