बारा आण्यांच्या मसाल्यासाठी चार आण्यांची कोंबडी!

PMP-AC-Bus
PMP-AC-Bus

चिंगे, विमानापेक्षाही महाग अशा पीएमपीमधून शंभर- सव्वाशे रुपयांच्या तिकिटात तू प्रवास करत आहेस, याचा तुला अभिमान वाटला पाहिजे. आपले पीएमपीएलचे प्रशासन प्रवाशांची किती काळजी घेत आहे, याची ही चुणूक आहे. काय म्हणालीस? ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असं पीएमपीचे धोरण आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिंगे, वाट्टेल ते आरोप करू नकोस. उलट लोहगाव विमानतळापासून हिंजवडी, निगडी अशा पाच ठिकाणी जाण्यासाठी पीएमपीने तोट्यात बससेवा सुरू आहे. या मार्गावरून उत्पन्न फक्त चाळीस लाख रुपयांचे असतानाही पाच कोटींपर्यंतचा तोटा पीएमपी सहन करत आहे, याचे तुला कौतुक वाटलं पाहिजे. प्रवाशांच्या सोयीसाठी हल्ली एवढा मोठा तोटा कोण सहन करील? देशातच काय पण जगातही असे उदाहरण तुला सापडणार नाही. काय?

ठेकेदारांच्या हितासाठी हे सगळं चाललंय, असं म्हणतेस? अगं चिंगे, पण ठेकेदारही हा माणूसच आहे ना? एखादवेळी त्याच्या हिताचा विचार केला तर बिघडले कोठे? कोणाचंतरी चांगलं होत असेल तर तुझ्या का पोटात दुखतंय? मागेसुद्धा तलावात नसलेली जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने २३ कोटी रुपयांची निविदा मंजूर केली होती. तेव्हासुद्धा तू इतर पुणेकरांबरोबर आंदोलनात सहभागी झाली होती. पुरेशा पाणीपुरवठा असतानाही टॅंकरसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी महापालिकेने मंजूर केला, तेव्हासुद्धा तुझी भूमिका अशीच होती. 

पण महापालिका किंवा पीएमपी प्रशासन असे का करते? त्यांची त्यामागील भूमिका समजून का घेत नाहीस? सर्वसामान्य माणसांचा फायदा यामधून कदाचित होत नसेल पण ठेकदारांना सोन्याचे दिवस यातून येतात, हे विसरू नकोस. कोणी तरी यातून सुखी होतो ना? हे काय कमी महत्वाचे आहे का? 

अनेक तोट्यातील उपक्रम प्रवाशांच्या सुखासाठी राबवले जातात. मात्र, प्रवाशांपर्यंत ते पोचत नाहीत, हा काही पीएमपीचा दोष नाही. उपक्रमांची जाहिरात का करत नाहीत, असा प्रश्‍न तुला पडला असेल? पण आपल्या स्वतःच्या माणसाशिवाय पीएमपी कोणाचीही जाहिरात करत नाही, हे तुला माहिती नाही का? 

विमानतळावरून एवढ्याच खर्चात प्रवाशांना पीएमपी बसएवजी हेलिकॉप्टरने त्यांच्या घरी सोडता आले असते. राहिलेल्या पैशात त्यांच्या खाण्या- पिण्याचीही उत्तम सोय करता आली असती, असं खवचटपणे बोलू नकोस. पीएमपीसाठी प्रवासी हाच देव आहे. त्यांच्या सुखासाठी व प्रगतीसाठी पीएमपी नेहमीच प्रयत्न करीत असते. ‘पुढे चला.. पुढे चला’ हे आई- वडिलानंतर फक्त पीएमपीचा कंडक्टरच म्हणत असतो, हे विसरू नकोस. आयुष्यातील धक्क्यांची प्रवाशांना सवय व्हावी म्हणूनच बसमध्ये त्यांना धक्के बसावेत, याची काळजी बसचालक घेत असतो. बसमध्ये गेल्यानंतर वाहक वसकन अंगावर येतो, अपमानास्पद बोलत असतो, त्यामागेही प्रवाशांची संयमशीलता वाढावी, हाच हेतू असतो.

पीएमपीची बस थांब्यावर कधीच थांबत नाही. अलीकडे वा पलीकडे शंभर मीटर लांब थांबते. प्रवाशांचा पळण्याचा व्यायाम व्हावा, हाच हेतू त्यामागे असतो. चिंगे आता मला सांग, प्रवाशांच्या सुखासाठी एवढं कोण करतं? आणि तू मात्र ठेकेदाराच्या फायद्यासाठी विमानतळापासूनची बससेवा सुरू ठेवलीय, असा आरोप करतेस? हे बरोबर आहे का? तू आधी तुझे शब्द माघार घे. नाहीतर बसमधून मुकाट्याने खाली उतर. उतर म्हणजे उतर.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com